माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा संपन्न..
⚡सावंतवाडी ता.०४-:
येथील श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माऊली माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ कर्मचारी श्री. राजेंद्र उर्फ राजू गावकर हे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने संस्थेच्या वतीने आणि विद्यालयाच्या वतीने त्यांचा एक भव्य दिव्य असा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात गावकर यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्याचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.श्री देवी सोनुर्ली माऊली देवस्थानचे मानकरी माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ सभासद शंकर उर्फ बाळा गावकर यांच्या हस्ते राजेंद्र उर्फ बाळा गावकर यांना सन्मानित करण्यात आले.
शाळा हेच कुटुंब मानून केले काम: मान्यवरांकडून गौरव
राजेंद्र गावकर यांनी आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. शाळा हे आपले कुटुंब मानून त्यांनी संस्थेच्या व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या सत्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून:शरद धाऊसकर(पंचायत समिती सदस्य, न्हावेली)जितेंद्र गावकर(पंचायत समिती सदस्य, माजगाव मतदारसंघ)दिगंबर मोर्ये (अध्यक्ष, श्रीदेवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली)शंकर उर्फ बाळा गावकर व भाई गावकर (मानकरी, सोनुर्ली माऊली देवस्थान)मनोहर राऊळ,आनंद नाईक (संस्था उपाध्यक्ष),नारायण मोर्ये (सचिव)
नागेश गावकर (सहसचिव),भारती गावकर (खजिनदार)अरूण तेरसे(मुख्याध्यापक, माऊली माध्यमिक विद्यालय)तसेच विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक एम. जे. गवडळकर, पांडुरंग काकतकर, प्रदीप सावंत आणि कर्मचारी एस. व्ही. नाईक, एस. जी. ओटवणेकर, एस. टी. जाधव, व्ही. एन. निर्गुण यांच्यासहशिक्षक पालक संघ अध्यक्ष पदाधिकारी ग्रामस्थ, पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शाळेच्या विकासासाठी सदैव सहकार्य राहील” – राजेंद्र उर्फ राजू गावकर ज्येष्ठ कर्मचारी
सत्काराला उत्तर देताना भावूक झालेल्या राजेद्र उर्फ राजू गावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. “मी जरी आज शासकीय सेवेतून निवृत्त होत असलो, तरी माऊली माध्यमिक विद्यालयाशी असलेले माझे नाते कधीच तुटणार नाही. शाळेच्या आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव सहकार्य करण्यास तत्पर राहीन,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात करण्यात आले होते. यावेळी शरद धाऊसकर(पंचायत समिती सदस्य, न्हावेली)जितेंद्र गावकर(पंचायत समिती सदस्य, माजगाव मतदारसंघ) याचा शाल श्रीफळ देऊन खास सत्कार करण्यात आला.यावेळी मोठ्याप्रमाणात पालक विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थित सर्वांनीच निवृत कर्मचारी राजेंद्र उर्फ राजू गावकर यांना त्यांच्या पुढील भावी व सुखी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अरूण तेरसे तर सूत्रसंचालन प्रदिप परब व आभार पांडुरंग काकतकर यांनी केले.
