शेर्ले पंचायत समितीत भाजपची ताकद पुन्हा सिद्ध..
⚡सावंतवाडी ता.१२-: तालुक्यातील शेर्ले पंचायत समिती मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले महेश धुरी यांनी आज आपल्या निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र प्रांताधिकारी समीर घारे यांच्या हस्ते स्वीकारले. यावेळी सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे उपस्थित होते.
भाजपचे बांदा मंडळ अध्यक्ष म्हणून कार्य करताना महेश धुरी यांनी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या कार्यशैली, कार्यकर्त्यांशी असलेला सुसंवाद आणि निवडणूक व्यवस्थापनातील कौशल्यामुळे भाजपला मोठा लाभ झाला होता. दोन वेळा मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. पक्षातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत त्यांना शेर्ले पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती.
महेश धुरी रिंगणात उतरल्यावर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी प्रेमापोटी आपली उमेदवारी मागे घेतली आणि त्यांना बिनविरोध निवडून दिले. त्यामुळे शेर्ले मतदारसंघात भाजपची संघटनशक्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, भाजपचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनीही आज आपल्या निवडीचे प्रमाणपत्र स्वीकारले. निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी तत्काळ प्रमाणपत्र स्विकारले नव्हते; मात्र अखेर आज त्यांनी अधिकृत प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी नायब तहसीलदार मनोज मुसळे उपस्थित होते.
