परशुराम उपरकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने समर्थक आक्रमक…

संबंधिताला जाब विचारताना दोन गटांत झाली धक्काबुक्की: पुन्हा टीका केल्यास योग्य तो धडा शिकवू..

⚡⚡सावंतवाडी, ता.१२-: माजी आमदार परशुराम उर्फ (जीजी) उपरकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका करण्यात आल्याचे निदर्शनास येताच त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधितांना जाब विचारला. खासकीलवाडा परिसरात झालेल्या या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, उपरकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यात आल्यानंतर समर्थक आशिष सुभेदार व इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी दोन गट आमनेसामने आले आणि धक्काबुक्की झाली. परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिकांनी मध्यस्थी केली. दरम्यान, समर्थक आक्रमक होत टीका करणाऱ्यांना तेथून पळ काढावा लागला.

यानंतर माजी आमदार उपरकर यांच्या समर्थकांकडून इशारा देण्यात आला की, भविष्यात सोशल मीडियावर चुकीची किंवा बदनामीकारक टीका केल्यास संबंधितांना योग्य तो धडा शिकवण्यात येईल.

दरम्यान, युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनीही प्रतिक्रिया देताना, “टीका करताना भान ठेवावे. अन्यथा आम्ही देखील उत्तरास प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत,” असा इशारा दिला.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी संयम बाळगण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page