लोकप्रतिनिधी-प्रशासन एकत्र येऊन कुडाळ तालुक्याचा विकास करू…

प्रफुल्ल वालावलकर:कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि प आणि पं स सदस्यांचा सत्कार,कुडाळ पं स, सरपंच व ग्रामसेवक संघटनेचा पुढाकार..

कुडाळ : तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करायला मिळणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जो पर्यंत लोकप्रतिनिधी सोबत नाहीत तो पर्यंत कामे होत नाहीत. कारण लोकप्रतिनिधी हे जनतेशी जोडले असतात, लोकप्रतिनिधी व अधिकारी ही विकासाच्या रथाची दोन चाके व्यवस्थित चालली तर विकास झपाट्याने होईल व पालकमंत्री, आमदार यांचे तसेच आपल्या सर्वांचे तालुक्याच्या विकासाचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन कुडाळ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. तसेच लोकप्रतिनिधीचा सन्मान हा प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेहमीच ठेवला पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचा कुडाळ पंचायत समिती, कुडाळ तालुका सरपंच संघटना व कुडाळ तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पंचायत समितीच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सहाय्यक गटविकास अधिकारी, कुडाळ तालुका सरपंच संघटना अध्यक्ष राजन राजन परब, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष प्रदीप नारकर, विस्तार अधिकारी संजय ओरोसकर, गजानन धरणे, तालुका पशु वैद्यकीय अधिकारी अभिजीत कसालकर, गट शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मार्च २०२२ मध्ये मुदत संपल्यानंतर कोविड आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन झाल्याकारणांमुळे निवडणुका रखडल्या होत्या. अखेर अलीकडेच निवडणुका पार पडून नव्या प्रतिनिधींनी सभागृहात हजेरी लावताच त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सभागृहातील पहिल्या रांगेत जिल्हा परिषद सदस्य, तर दुसऱ्या रांगेत पंचायत समिती सदस्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम उर्फ दादा साईल (पावशी), रुपेश पावसकर (नेरुर), दीपलक्ष्मी पडते (आंब्रड), नागेश आईर (वेताळबांबर्डे), सुप्रिया वालावलकर (ओरोस), केशव उर्फ दीपक नारकर (घावनळे), गंगाराम सडवेलकर (पिंगुळी), रुपेश कानडे (माणगाव), आरती पाटील (तेंडोली), तसेच पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू (तेंडोली), बाळकृष्ण मडव (जांभवडे), अर्चना बंगे (नेरुर दक्षिण), दीप्ती नाईक (नेरुर उत्तर), संतोष कांदळकर (कसाल), ममता राऊळ (पिंगुळी), मिलिंद नाईक (साळगाव), योगेश धुरी (माणगाव), सिताराम तेली (झाराप), नितीन महाडेश्वर (आंब्रड), करुणा पावसकर (पावशी), श्रावणी तेरसे (आवळेगाव), निखिल कांदळगावकर (डिगस), प्रियांका दळवी (पाट), अर्चना घावनळकर (घावनळे), अश्विनी सावंत (वेताळबांबर्डे), दिव्यांनी खरात (गोठोस), अमित भोगले (ओरोस) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, तालुक्यात ३ हजार ५०० घरकुल आवास मधून घरे मंजूर झाली आहेत. परंतु अजूनही बांधकामे पूर्ण झाली नाहीत. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असे आवाहन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.
यावेळी राजन परब म्हणाले, गेले चार वर्षे प्रशासकीयय राजवट होती. होते. या चार वर्षात ग्रामपंचायतीची बरीच कामे प्रलंबित आहेत. नवनिर्वाचित सदस्यांची आता या ठिकाणी जबाबदारी वाढली आहे. या कामांना आता हातभार लागेल.
दीपलक्ष्मी पडते यांनी सांगितले की, हा कौटुंबिक सत्कार आहे. राज्यात केंद्रात सत्ता आपली आहे. त्यामुळे व खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे यांच्या कार्यप्रणालीमुळे विकास कामे होणार आहेत. ही विकास कामे होत असताना अधिकारी व कर्मचारी यांनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
दिपक नारकर म्हणाले, तालुक्यातील जनतेचे प्रश्न मांडणे, सोडविणे या करिता हे पंचायत समितीचे सभागृह आहे. या सभागृहात विविध हेड खाली चांगले प्रस्ताव द्यावेत. जेणे करून विकास निधी आणता येईल. रुपेश पावसकर यांनी सांगितले की, कुडाळ तालुका कृषी प्रधान तालुका आहे, माझ्या नेरूर मतदार संघ पर्यटन दृष्ट्या विकसित होवू शकतो व त्या करीता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व सर्व अधिकारी या सर्वांचे सहकार्य घेवून काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी रुपेश कानडे म्हणाले, लोकसेवक म्हणुन आम्ही निवडून आलो आहोत. जनतेचे प्रश्न सोडविणार, या पंचायत समितीची नवीन इमारत व्हावी, पत्रकार कक्ष, सरपंच संघटना कार्यालय यासाठी पालकमंत्री व आमदार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असे सांगितले. जे काही सर्व करू ते कुडाळ तालुक्याच्या विकासासाठी करू असे सांगितले. दादा साईल म्हणले, जिल्हा परिषद व पंचायत समिती ही रचना ग्रामीण भागातील विकासाचे काम करणाऱ्या रथाची दोन चाके आहेत. रस्ते वीज पाणी या पलिकडे जावून विकास केला पाहिजे, दर्जेदार शिक्षण, चांगली आरोग्य सेवा, बेरोजगारी उच्चाटन यासाठी सर्वानी आपण प्रयत्न केले पाहिजेत. पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे हे अर्थतज्ज्ञ आहेत, लोकप्रतिनिधी आता प्रशासनाच्या मदतीला आहेत, त्यामुळे एकत्र येत काम करूया व सर्वागीण विकासाचे स्वप्न साकार करूया असे आवाहन केले.
यावेळी नागेश आईर यांनी सांगितले की, या तालुक्याचा व जिल्ह्याचा विकासासाठी कार्यरत राहणार. जेवढे ग्रामपंचायतीचे काम चांगले तेवढे तालुक्याचे नाव मोठे होईल. गंगाराम सडवेलकर म्हणाले, आमची भूमिका ही सहकार्याची असेल. शिक्षण, आरोग्य, जेष्ठ नागरिकांना सुविधा यासाठी कार्यरत राहू. मिलिंद नाईक यांनी सांगितले की, शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पहिल्यांदाच आयोजित केला आहे. आता आमची जबाबदारी वाढली आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी या एकाच रथाच्या दोन चाके आहेत. सर्वानी एकत्र येत कुडाळ तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत राहूया असे आवाहन त्यांनाही केले. सीताराम तेली म्हणाले, ज्या सभागृहात बसुन काम करायचे आहे त्याच सभागृहात सत्कार केला हे आमच्यासाठी खूप मोठा सत्कार आहे.
या कार्यक्रमाला कुडाळ तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी, सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. सभागृह खचाखच भरल्याने वातावरणात उत्साहाची लाट उसळली होती. दादा साईल यांच्या शब्दात सांगायचे तर बोटावरची शाई फुसायाच्या आत कुडाळ पंचायत समिती, सरपंच आणि ग्रामसेवक संघटना यांच्या तर्फे झालेला या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश परब यांनी तर प्रास्ताविक ग्राम पंचायत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप नारकर यांनी केले. एकूणच, नव्या नेतृत्वाच्या सत्कारातून कुडाळ तालुक्यात विकासाच्या नव्या पर्वाची नांदी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची खरी जबाबदारी आणि म्हटले तर कसोटी नव्या लोक प्रतिनिधींसमोर आहे.

You cannot copy content of this page