इंडियन ऑइलचे रोहित कांबळे यांनी दिली माहीती..
⚡कुडाळ ता.११-: देशाच्या ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सक्षम 2025-26 संरक्षण क्षमता महोत्सव कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यकर्मांच आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी रोहित कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुडाळ येथील लक्ष्मी नारायण पेट्रोल पंप येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या उपक्रमाचे उद्दिष्ट, कालावधी आणि विविध कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी सक्षम संरक्षण समता महोत्सव बाबत प्रतिज्ञा घेतली.
यावेळी पत्रकार परिषदेस लक्ष्मी नारायण पपचे मालक ओंकार देसाई,पालव पेट्रोललिएम चे मालक जयभारत पालव उपस्थित होते.
श्री. कांबळे यांनी सांगितले की, ‘सक्षम 2025-26’ हा भारत सरकारतर्फे राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम असून देशाची ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण हे त्यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे, इंधनाची बचत करणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
१ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा महोत्सव देशभर साजरा केला जाणार असून “कन्झर्व फ्युएल, सेव द फ्युचर” हा यंदाचा संदेश आहे. या काळात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा तसेच इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा आयोजित केल्या जातील. याशिवाय एलपीजी ग्राहक, वाहनचालक, ट्रान्सपोर्टर, शेतकरी, उद्योग क्षेत्रातील कर्मचारी आदी विविध घटकांपर्यंत इंधन बचतीचे महत्त्व पोहोचविण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
इंधन कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
