मोहिनी मडगावकर:उद्यानातील धोकादायक खेळणी बदलणार..
सावंतवाडी,ता.१२: शहरातील महिला व युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आणि पर्यटन वृद्धीसाठी येथील गोदामाच्या मागे असलेल्या आठवडा बाजार भरत असलेल्या रिकाम्या जागेत लवकरच खाऊगल्ली करण्यात येणार आहे,
अशी माहिती आज येथे सावंतवाडी पालिकेच्या उद्यान व पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी दिली.
दरम्यान येथील उद्यानात असलेली जुनी खेळणी बदलण्यासोबत त्या ठिकाणी धोकादायक असलेल्या नाल्यावर स्लॅब घालण्यासाठी तसेच शहराच्या संस्कृतीला साजेल असा सेल्फी पॉइंट उभारण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सौ. मडगावकर यांनी काल सभापती पदाचा कार्यभार घेतल्यानंतर आज त्यांनी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची संवाद साधला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या, या ठिकाणी असलेली जुनी खेळणी धोकादायक झालेली आहेत. त्यामुळे ती बदलण्यासाठी लवकरच पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बाजुला धोकादायक असलेला नाला बंदिस्त करण्यात येणार आहे. एमटीडीसीच्या माध्यमातून लावण्यात येणारी खेळणी पुन्हा सुरू करता येतील का? या संदर्भात पालिका प्रशासनाची चर्चा करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या गोदामाच्या बाजूला असलेल्या आठवडा बाजाराच्या जागेची पाहणी केली. शहरात अनेक युवक व महिला बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार देता यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असणार आहेत. येणाऱ्या काळात तर त्यांना रोजगार मिळावा यासाठी या ठिकाणी खाऊ गल्ली उभारण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी पालिकेच्या बैठकीत योग्य तो ठराव घेऊन निर्णय घेतला जाईल. त्या ठिकाणी आठवडा बाजार दर मंगळवारी भरतो. मात्र अन्य वेळी ती जागा रिकामी असते. त्यामुळे त्या जागेचा फायदा होऊ शकतो. आठवड्याच्या बाजारी संबंधित व्यापाऱ्यांना सुट्टी देऊन बाजार यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे त्याचा तोटा कोणाला होणार नाही आणि विशेष म्हणजे नवीन रोजगाराचे दालन उभे राहणार आहे.
त्या पुढे म्हणाल्या, या ठिकाणी सावंतवाडी शहरात च्या बाहेरून हायवे आणि रेल्वे गेल्यामुळे त्या ठिकाणी शहर दुर्लक्षित राहिले आहे. पर्यटक बाहेरून जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेले उद्योगधंदे ओस पडत चालले आहेत आणि हॉटेल बंद पडत आहेत. ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत सकारात्मक धोरण ठरवले जाणार आहे. आमचे नेते पालकमंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्यासह सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
