…म्हणून २६ नोव्हेंबर दिवस संविधानदिन साजरा करतात

प्रा डॉ एस पी वेल्हाळ यांनी उलगडला इतिहास

बांदा/प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन केलेल्या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय घटना लोकांनी बनविलेली आहे. हा कायदा भारतीय लोकांसाठी आहे. भारत सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, गणराज्यात्मक व्हावा हा उद्देश भारताचे संविधान तयार करताना होता. भारतीय संविधानाचे पालन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव ही भारतीय घटनेची उद्दिष्टे आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी समतेची आवश्यकता आहे. भारतीय राज्यघटना उदात्त आहे. प्रत्येक नागरिकाने घटनेचे पालन केल्यास आदर्श राज्याची निर्मिती होऊ शकेल असे प्रतिपादन गोगटे वाळके महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. पी. वेल्हाळ यांनी संविधान दिनानिमित्त केले.
बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र विभाग आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठी विभागाचे प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते. भारताची यंत्रणा संविधानावर चाललेली आहे. लोककल्याण, आर्थिक समानता, स्त्री पुरुष समानता, धार्मिक व जातीय सलोखा याची शिकवण भारतीय संविधान देते. सर्वांनी भारतीय घटनेचा सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन डॉ. काजरेकर यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. किशोर म्हेत्री यांनी केले. आभार प्रा. रश्मी काजरेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले.
याप्रसंगी आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे जिल्हा क्षेत्र समन्वयक प्रा. उमेश परब, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page