२०२२ मधील सलग दुसऱ्या पुरस्काराने सन्मान
वैभववाडी संजय शेळके
शिक्षण, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम आकाराम साटम यांना भारतीय उत्कृष्ट नागरिक सम्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे. जुलै 2022 मध्ये त्यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांना हा दुसरा पुरस्कार मिळाला आहे. टिजीएचआरएफ दिल्ली यांच्या कडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
दत्ताराम साटम हे करूळ गावचे रहिवासी आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून अनेक वर्ष कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. वैभववाडी, कणकवली व गगनबावडा या तालुक्यात त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. शाळांचा १०० टक्के निकाल यात साटम गुरुजी यांचे योगदान आहे. शासनाचा अल्पबचत उपक्रम, कुटुंब कल्याण उपक्रम यात त्यांनी कामाचा ठसा उमटविला होता. दरम्यान त्यांना जिल्हा परिषदच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सन १९९६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीच्या नंतर त्यांनी संपूर्ण काळ समाजासाठी झोकून देत काम केले. शिक्षण, समाजसेवा आणि वारकरी संप्रदायाचे सेवक म्हणून केलेल्या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
श्री. साटम हे वारकरी सांप्रदायात अनेक वर्ष कार्यरत आहेत. तालुक्यातून दरवर्षी जाणाऱ्या पायी वारीचे ते प्रतिनिधीत्व करत आहेत. वैभववाडी तालुका वारकरी सांप्रदायचे अध्यक्ष आहेत. वैभववाडी तालुका नागरी पतसंस्थेचे ते व्हा. संचालक आहेत. ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र वारकरी महामंडळ वैभववाडी तालुका अध्यक्ष, रासाई देवी दूध संस्था करुळ व्हा. चेअरमन, वैभववाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना उपाध्यक्ष या पदावर ते कार्यरत आहेत. पुरस्कार प्राप्त दत्ताराम साटम यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
फोटो – दत्ताराम साटम
