३० शिबिरार्थींनी गिरवले सामाजिक, आर्थिक प्रशासकीय धडे
⚡कणकवली ता.१०-: अनुभव शिक्षा केंद्र आयोजित युथ लीडरशिप बिल्डींग कोर्स शिबिराचा समारोप कार्यक्रम गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपुरी आश्रम येथे संपन्न झाला.
यावेळी अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, प्रशांत शिंदे, युवाचे नितीन कुबल, अनुभव शिक्षा केंद्र मुंबई कोकण विभागीय समन्वयक आसमा अन्सारी, जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, दरक्षा शेख, उषा पटनायक, किशन सलबुल, सना शेख हे उपस्थित होते.
दहा दिवसांचा कोर्स गोपुरी आश्रम, वागदे येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये लीडरशिप, संविधान, प्रशासकीय यंत्रणा, लिंगाधारित समानता, ग्रामपंचायत बजेट, वातावरणातील बदल, समुदायाचे प्रश्न आणि चर्चा, युथ पॉलिसी तसेच पंचायत समिती अभ्यास दौरा अशा विषयांवर सत्रे आयोजित करण्यात आली होती. मुंबई ते कोकण पट्ट्यातील ३० युवक युवती या शिबिरात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमावेळी डॉ. मुंबरकर बोलताना म्हणाले की याआधीही गोपुरीमध्ये शिबिरे होत पण या युवकांच्या शिबिराने गोपुरीमध्ये नवप्रेरणा निर्माण झाली. मुंबई मधून येऊन आपण गांधीजींच्या विचारांची आणि आपासाहेबांच्या मेहनतीची गोपुरी ही शिबीर स्थळ म्हणून निवड केली याबद्दल ऋण मानले.
अनुभव शिक्षा केंद्रामार्फत सहभागी शिबिरार्थीना अनुभव बिल्ला, सहभाग प्रमाणपत्र, संविधान प्रास्तविका देऊन गौरविण्यात आले. शिबीर यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते साद टीम, कणकवली, श्रद्धा पाटकर आणि विशाल गुरव यांचा सत्कार करण्यात आला. दहा दिवस उत्तम नाश्ता व जेवणाची सोय करणारे अमोल सावंत व टीम यांचा सत्कार करण्यात आला.
या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अनुभव शिक्षा केंद्राची माहिती आसमा अन्सारी यांनी केले. सूत्रसंचालन केशव नाचीवणेकर व नगमा यांनी केले. प्रमाणपत्र वितरीत करताना सूत्रसंचालन उषा पटनायक व मान्यवरांची ओळख सहदेव पाटकर यांनी केले.