⚡मालवण ता.०९-: मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला. सर्वच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीच्या पॅनलचे उमेदवार विजयी होऊन खरेदी विक्री संघामध्ये सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वास यावेळी बाळू अंधारी यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या पॅनल मधून तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक मनोज लुडबे, मनोज राऊत, सुभाष तळवडेकर हे पुन्हा आपले नशिब अजमावत आहेत. जिल्हा बँक संचालक तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी हेही या पॅनेलचे नेतृत्व करत आहेत. माजी नगरसेविका नीना मुंबरकर याही नगरपालिका राजकारणातून आता सहकार क्षेत्रात आपली दावेदारी निश्चीत करण्यासाठी सज्ज आहेत. माजी सरपंच राहिलेले चंदन पांगे आणि साक्षी लुडबे याही निवडूक रिंगणात आहेत. अंधारी हे जिल्हा वैश्य समाज पतसंस्थेचे संस्थापक आहेत. आटक हे सहकारातील शासकीय नोकरीतून आता थेट सहकारात काम करण्यासाठी सज्ज आहेत. सहकार अनेक वर्ष काम केलेले आणि अनेक संस्था उभ्या केलेल्या व्यक्तींचा महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये भरणा असल्याने या पॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
खरेदी विक्री संघामध्ये काम करणारे कामगार आणि संस्थेवर विश्वास ठेवून असलेल्या सभासदाच्या हितासाठी आमचे पॅनेल राहणार आहे. आजपर्यंत संस्थेतील अनेक वादातील गोष्टीवर आमच्यातील माजी संचालकांनी आवाज उठविला होता. मात्र सत्ताधारी नसल्याने या संचालकांच्या सूचनांकडे कानाडोळा करण्यात आलेला आहे. आता सभासदांनी विश्वास दाखविला तर परिवर्तन निश्चीत होणार असून सध्या प्रचारात फिरताना सर्वत्र मिळत असलेला प्रतिसाद पाहून यावेळी महाविकास आघाडीची सत्ता खरेदी विक्री संघावर निश्चीत येईल, असा विश्वास श्री. बाळू अंधारी यांनी व्यक्त केला.