रेल्वेतून ४२ लाख रक्कम असलेल्या बॅगेच्या चोरीसाठी टीप देणाऱ्या संशयिताला जामीन

⚡कणकवली ता.०९-: कोचिवेली एक्सप्रेसमधून रत्नागिरी ते केरळ असा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्याकडील ४२ लाख रकमेच्या दोन बॅगा चोरी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या आरोपींना रकमेबाबतची टीप देणारा संशयीत विनोद अधिकारराव पोळ (मुळ जि. सांगली, घटनेवेळी नेपाळ) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी २५ हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला. संशयिताच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

दि. २५ मे २०२२ रोजी फिर्यादी ओमकार सुर्यवंशी हा नातेवाईक शंकर दबडे व विलास धनावडे यांची सोने व्यवसायातील मशिन खरेदीसाठी रक्कम घेऊन जात असताना रकमेबाबतची टीप व्हॉटसअॅप कॉलद्वारे नेपाळमध्ये असलेला आरोपी व सुर्यवंशीचा नातेवाईक विनोद पोळ याने अन्य संशयित नितीन जाधव, अक्षय मोहिते, किरण कांबळे, आनंद काळे, प्रथमेश शिंदे, अक्षय मोरे यांना दिली. त्यानंतर संशयितांनी कृष्णा इंडस्ट्रीज विटा येथे नियोजनबद्ध कट केला. त्यानुसार २५ मे २०२२ रोजी ओमकार याला पोलीस असल्याची बतावणी करून कुडाळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वेबाहेर बोलावून रेल्वेसुटेपर्यंत थांबवून ठेवले. याच काळात अन्य संशयितांची रकमेची चोरी केली. याबाबत कुडाळ पोलीस स्टेशन येथे आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३९५, ३२७, ४१७, १७०, १२० ब सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात अटकेत असलेल्या आरोपींकडून विनोद पोळ याने याबाबत टीप दिल्याची कबुली प्रत्यक्ष रक्कम चोरी करणाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर विनोद भारतात परतताच त्याला कुडाळ पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी विनोद पोळ याच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी होत २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना साक्षीदारांशी संपर्क साधू नये, पुराव्यात ढवळाढवळ करू नये, आपला कायमचा पत्ता पोलिसांकडे द्यावा. न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारत सोडून जाऊ नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page