वैभववाडी येथे चेतना यात्रेचे भव्य स्वागत; कणकवलीत मोटारसायकल रॅली, शोभायात्रा
कणकवली 8 नोव्हेंबर (प्रतिनिधी)-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारी मजदूर चेतना यात्रा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, गगनबावडा मार्गे वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे १२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता दाखल होईल. सदर यात्रा वैभववाडी, नाधवडे, तळेरे, नांदगाव, बेळणे मार्गे जानवली कणकवली येथे दाखल होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील संघटीत व असंघटीत कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २१ डिसेंबर २०२२ रोजी ” चलो मुंबई ” असा लक्षवेधी महामोर्चा भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित केला आहे. सदरच्या महामोर्चाच्या अनुषंगाने भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाने ६ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर कामगारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने चेतना यात्रेचे आयोजन केले असून हि चेतना यात्रा शिवनेरी गड पुणे येथून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सुरु करण्यात आलेली आहे.
वैभववाडी येथे चेतना यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येईल. वैभववाडी येथून मोटारसायकल रॅली समवेत ठिकठिकाणी स्वागताचे कार्यक्रम करत चेतना यात्रा कणकवली येथे दाखल होईल. कणकवली येथे शहरातून मोटारसायकल रॅली, शोभायात्रा, ढोलपथक यांच्या सहभागातून कणकवली जानवली पुलाकडून एस टी स्टँडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पटवर्धन चौक येथे एकत्रीकरण व मार्गदर्शन करण्यात येईल.
सदरच्या चेतना यात्रेस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.
