⚡मालवण ता.३१-: थोर लोकनेते आणि संसदपटू स्व.बॅ. नाथ पै यांचे जीवनचरित्र समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या उद्देशाने मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या एस. एम. जोशी संकुलात नाथ पैंचे स्मृतिदालन निर्माण करण्यात आले आहे. या स्मृतिदालनातील दुर्मिळ छायाचित्रांमधून नाथ पै यांचा जीवनपट अत्यंत प्रभावीपणे उलगडला गेला असून आजच्या पिढीला बॅ. नाथ पै समजून घेण्यासाठी हे स्मृतिदालन महत्वाचे ठरणार आहे.
मालवण येथील बॅ. नाथ सेवांगण येथे निर्माण केलेल्या या स्मृतीदालनाचे लोकार्पण बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महिनाभरापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या दालनासाठी प्रशांत देशपांडे आणि अदिती पै यांनी विविध छायाचित्रे उपलब्ध करून नाथ पैंच्या स्मृती जिवंत केल्या आहेत.
या दालनातील छायाचित्रांमधून बॅ. नाथ पै यांच्या या संपूर्ण जीवन संघर्षाचे जीवंत चित्रण उभे केले आहे. बेळगावने तरुण नाथ पैंच्या उमद्या मनाला राष्ट्रवाद, देशभक्ती आणि स्वातंत्र्य आकांक्षेचे खतपाणी घातले आणि नाथांनी पाहता-पाहता मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. असाधारण बुद्धिमत्ता, मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर केवळ भारताच्याच राजकीय, सामाजिक जीवनावर नव्हे, तर परदेशातही त्यांनी आपला ठसा उमटविला होता. बेळगाव महाराष्ट्रात यावे तसेच मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून त्यांनी केलेल्या प्रखर संघर्षाचा आणि गोवा मुक्तीच्या कष्टप्रद लढ्याचाही समावेश आहे. राजापूर लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा ते खासदार म्हणून निवडून आले. लोकसभेतील त्यांच्या पहिल्याच प्रभावी आणि चमकदार भाषणाने त्यांनी सभागृह दणाणून सोडले. त्यावेळी खुद्द तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे नाथ पै यांचे विचार ऐकण्यासाठी संसदेत उपस्थित राहायचे. संरक्षणापासून ते परराष्ट्र किंवा आर्थिक धोरणापर्यंतच्या विविध विषयांवरील अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणीसाठीही त्यांची ख्याती होती.
आजच्या पिढीने नाथ पै यांचा हा जीवनपट समजून घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी या स्मृतीदालनास सर्वांनी भेट देऊन बॅ. नाथ पै यांचे जीवनचरित्र जाणून घ्यावे, असे आवाहन सेवांगण तर्फे करण्यात आले आहे.
