⚡मालवण ता.३१-: पारंपरिक गिलनेट प्रकारातील न्हैय नावाच्या मासेमारीस गेलेल्या तळाशीलमधील मच्छीमारांच्या जाळ्यात सुमारे १५ फूट लांबीचा महाकाय असा ‘व्हेल शार्क’ मासा अडकला असता मच्छीमारांनी प्रसंगावधान राखत जाळे कापून माशाची सुटका करत त्यास जीवदान दिले.
तळाशील येथील पद्मजा नावाचे फायबरचे बल्याव घेऊन दोन दिवसांच्या मासेमारीसाठी प्रथमेश शेलटकर, हिरेश मायबा, अक्षय पवार, अक्षय पवार, शामा तारी, भूषण पाटील, ललित देऊलकर आदी मच्छीमार शुक्रवारी गेले होते. ते समुद्रात ४१ वावात मासेमारी करीत असताना रविवारी सकाळी त्यांच्या जाळ्यात सुमारे १५ फूट लांबीचा व्हेल शार्क सापडला. मच्छीमारांनी जाळे कापून त्याची जाळ्यातून सुटका केली. स्थानिक मच्छीमार या माशाला ‘भेरा’ असे म्हणतात. त्याचा पाठीमागचा भाग हा शार्कसारखा आणि तोंडाकडील भागाची रचना व्हेलसारखी असल्याने त्याला व्हेल शार्क असे संबोधतात. व्हेल शार्क ही वन कायद्यांतर्गत संरक्षित प्रजाती असून अशा प्रजातींची जाळ्यातून जिवंत सुटका केल्यास शासनाकडून जाळी नुकसान भरपाईपोटी आर्थिक अनुदान देण्याची तरतूद तरतूद आहे.
