उद्योजक शैलेश लाड यांची ग्वाही
⚡बांदा ता.२९-: शरीराने मतिमंद, कर्णबधिर असली तरी ही मुले आपल्या समाजाचाच एक भाग असून कोणतेही शासकीय अनुदान मिळत नसतानाही या मुलांची माणुसकीच्या भावनेतून सुश्रुषा करणे हे कौतुकास्पद आहे. भविष्यात या मुलांसाठी व शाळेच्या भौतिक गरजासाठी आम्ही निश्चितच मदत करू अशी ग्वाही उद्योजक शैलेश लाड यांनी कोंडूरा येथे दिली.
शैलेश लाड मित्रमंडळाच्या वतीने कोंडूरा येथील श्री माऊली मतिमंद व कर्णबधिर शाळेत आयोजित कार्यक्रमात श्री लाड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पत्रकार निलेश मोरजकर, अभिनेते गुणेश गवस, इन्सुली प्राथमिक शाळेचे उपशिक्षक हंसराज गवळे, कर सल्लागार समीर परब आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत मुलांनी केले. यावेळी मान्यवरांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधला.
निलेश मोरजकर म्हणाले की, समाजाने देखील या मुलांसाठी काहीतरी करण्याचे ध्येय बाळगावे. या मुलांना देखील समाजात हक्काने जगण्याचा अधिकार असून यासाठी लाड मित्रमंडळाच्या वतीने भविष्यात मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गुणेश गवस यांनी या मुलांची सुश्रुषा करणाऱ्या सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे कौतुक केले. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षक प्राणेश नाईक, नंदिनी आचरेकर, सरोज चव्हाण, संगीता उकरंडे, शिक्षकेतर कर्मचारी गंगाराम शेळके, नंदा सावंत, सविता मोरजकर, दीपाली कदम, नम्रता सावंत, गोकुळ कवठणकर, रामचंद्र गोडकर आदी उपस्थित होते. आभार गंगाराम शेळके यांनी मानले.
