भिरवंडे सरपंचांवरील कारवाई विरोधात शिवसेना आवाज उठविणार

शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत व मंगेश सावंत यांचा इशारा

⚡कणकवली ता.२९-: भिरवंडे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. सुजाता सावंत यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही तसेच कोणताही आर्थिक गैरव्यवहार केलेला नाही. केवळ राजकीय दबावाखाली भिरवंडे ग्रामपंचायत निवडणूकीत दारुण पराभव झाल्याने सत्तेचा दुरुपयोग करीत अधिकाऱ्यांवर दबाव टाकत केवळ राजकीय सूड उगविण्यासाठी कारवाई करण्यात आली अशी टिका शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत व माजी पं.स. सदस्य मंगेश सावंत यांनी केली.

सरपंच सौ. सुजाता सावंत यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला राजकीय हेच कारण असल्याचे डॉ. प्रथमेश सावंत व मंगेश सावंत सांगितले. मुळात ज्या रस्त्याच्या प्रस्तावाला २३ चा उतारा जोडण्यात आला तो केवळ ते काम वेळेत मार्गी लागावे, जेणे करून रस्त्यासाठी आलेला निधी परत जाऊ नये म्हणून. सरपंचपदी सुजाता सावंत यांची नव्यानेच निवड झालेली असल्याने त्यांना प्रशासकीय कामकाज पुरेसे माहीत नसल्याने केवळ रस्ता म्हणून तसा प्रस्ताव दिला होता. रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया अथवा पूर्ण करुन निधी खर्च केलेला नव्हता. त्या कामावर निधी खर्च झालेला नसल्याने कोणताही आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही. केवळ एखाद्या महिला सरपंच प्रशासकिय अनुभव कमी असल्याने त्याचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत राजकीय सूड उगविणे अशोभनीय आहे.

भिरवंडे सरपंच यांनी ज्या रस्त्याच्या कामाला 23 नंबर उतारा दिला त्या जागेच्या जमीन मालकांनी तक्रार दिली असती तर एकवेळ चालले असते, मात्र जमीन मालकांनी कोणतीही तक्रार दिली नसताना एका राजकीय पदाधिकाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवत महिला सरपंचांवर तक्रार करणे योग्य नव्हे. आपली राजकीय ताकद वापरत कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत अपात्रतेची कारवाई करणे तमाम महिला भगिनींचा अपमान आहे. नव्हे यातून भिरवंडे गावाचीही बदनामी करण्यात आहे. भिरवंडे गावात विकासाच्या योजना सक्षमपणे राबविल्या जात असताना आपला राजकीय हेतू साध्य होण्यासाठी एका महिला भगिनीच्या डोळ्यात पाणी आणणे, त्यांना त्रास देणे नैतिकतेला धरून नाही. गाव विकास करीत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतो ही वस्तुस्थिती आहे. भिरवंडे सरपंच सौ. सुजाता सावंत यांच्यावर ज्या आकसापोटी कारवाई करण्यात आली तशी कारवाई जिल्ह्यातील शंभर टक्के सरपंचांवर होऊ शकते निधी खर्च करत असताना काही ठिकाणी अडचणी येत असतात त्या आजवर दुर्लक्ष केल्या जात होत्या मात्र आकसापोटी कारवाई आहे. सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला आहे असे आमचे ठाम मत आहे. या कारवाई विरोधात शिवसेना आवाज उठविणार असल्याचे डॉ. प्रथमेश सावंत व मंगेश सावंत यांनी सांगितले

You cannot copy content of this page