युथ फोरमच्या राज्यस्तरीय पोट्रेट रांगोळी स्पर्धेत ३१ जणांचा सहभाग

ऍड अविनाश माणगावकर यांच्याहस्ते झाला शुभारंभ

⚡देवगड ता.२८-: युथ फोरम देवगड आयोजित भव्य राज्यस्तरीय PORTRAIT रांगोळी स्पर्धा 2022 वर्ष दुसरे 27 ऑक्टोबर 2022 रोजी शेठ म. ग. हायस्कूल देवगड येथील गुरुदक्षिणा प्रेक्षागृह येथे पार पडली. या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन ॲड. अविनाशजी माणगांवकर यांच्या हस्ते पार पडले. संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 31 स्पर्धक सहभागी झाले होते. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 28 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजेपर्यंत सलग 24 तास ही स्पर्धा सुरू होती.

प्रत्येक स्पर्धकाने विविध प्रकारची व्यक्तिचित्रे अत्यंत सुरेख पद्धतीने रांगोळी स्वरूपात साकारली. यामध्ये, मालवणच्या समीर अशोक चांदेरकर यांनी साक्षात चित्र जिवंत करून साकारलेल्या रांगोळीने प्रथम पारितोषिक पटकावले. त्याचप्रमाणे कुडाळच्या केदार सखाराम टेमकर यांनी द्वितीय आणि रत्नागिरीचे राहुल दत्ताराम कळंबटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. आणि साईनाथ उमेश पारकर, मालवण. किशोर सिताराम पांचाळ, मुंबई. रमेश रघुनाथ पांचाळ, मुंबई. सचिन नरेंद्र अवसारे, सांगली या चार स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित केले.

या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण कलानिकेतन महाविद्यालय, कोल्हापूरचे संचालक विजय टिपूगडे सर आणि कलानिकेतन महाविद्यालयचे कलाशिक्षक इंद्रजित बंदसोडे सर यांनी केले.
28 ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री. सतीशजी सावंत आणि जिल्हा बँक संचालक मा. श्री. सुशांत नाईक यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाची सुरुवात युथ फोरम देवगडचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. सतीशजी सावंत आणि सुशांत नाईक या दोन्हीही मान्यवरांनी युथ फोरम देवगड आयोजित रांगोळी स्पर्धेबद्दल आपले मनोगत व्यक्त करत सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा बँक अध्यक्ष ॲड. अविनाशजी माणगांवकर, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, युवा मोर्चा अध्यक्ष भाजप दयानंद पाटील, देवगड नागरी पतसंस्था संचालिका अनुश्री पारकर, व्यवसायिका शीतल कदम, उद्योजक मधुकर नलावडे, उद्योजक आणि रंगकर्मी संजय धुरी, ज्येष्ठ कलावंत आणि उद्योजक वैभव बिडये, युथ फोरम सोशल मीडिया अध्यक्ष आकाश सकपाळ आणि शहर कमिटी अध्यक्ष चिन्मयी बिडये उपस्थित होते. तसेच देवगड जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक, सर्व स्पर्धक, देवगड मधील विविध रांगोळी रसिक उपस्थित होते. युथ फोरम देवगडचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे यांनी रांगोळी स्पर्धेचा मुख्य उद्देश आपल्या मनोगता मधून व्यक्त केला.

कार्यक्रमा दरम्यान देवगड तालुक्यातील कलाशेत्रात विशेष प्राधान्य असलेल्या दिग्गजांचे सन्मान करण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी-उद्योजक संजय धुरी, कलाशिक्षक मृत्युंजय मुणगेकर, स्वप्नील सुतार, दर्शन सुतार, अनिकेत पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनतर देवगड मधील नावलौकिक आणि फार कमी वेळात आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले त्या इंद्रधनू क्लब या संस्थेचा देखील जाहीर सन्मान करण्यात आला. छोट्या बायोची मोठी स्वप्न या सोनी मराठी वर चालू असलेल्या आणि देवगड, वाडा – पुरळ येथे चित्रित होणाऱ्या मालिकेतील छोट्या बालकलाकारांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये अनुष्का पोकळे(इरा), शौरीन देसाई (आरव), चिन्मया ठाकूर(चैतन्या) यांना गौरविण्यात आले.
दोन महिना आधीपासून नियोजन करून या कार्यक्रमासाठी सर्व युथ फोरमच्या सदस्यांनी मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी याने केले, तर आभार प्रदर्शन युथ फोरम चे सचिव अमित पारकर यांनी केले.. तरी ३० ऑक्टोबर पर्यंत या PORTRAIT रांगोळींचे प्रदर्शन सर्व रसिकांसाठी खुले राहील आणि सर्वांनी गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात भेट देऊन या अविस्मरणीय कलाकृती पाहण्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन युथ फोरम देवगड च्या सर्व सदस्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page