सुधाताई कामत शाळेत वैविध्यपूर्ण उपक्रम वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य

⚡सावंतवाडी ता.२२-: : वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जि. प. च्या सुधाताई कामत शाळा क्रमांक २ येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. वाचनाचे ‘महत्व’ या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले. तसेच ‘आठवणीतील कविता’ हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मनोगतात मुख्याध्यापिका शुभांगी खानोलकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडी केंद्र गटाच्या केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, प्रमुख पाहुणे भरत गावडे, विकास गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शालेय मुलांनी ‘वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व’, ‘मी वाचलेले पुस्तक’ या विषयावर मनोगते व्यक्त केली. ‘हात धुवा दिनाचे महत्व’ व ‘आरोग्याचे महत्त्व’ केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे यांनी समजावून सांगितले.
भरत गावडे यांनी मानवी जीवनात वाचन हे अविभाज्य कसे आहे? या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी आवड निर्माण झाली पाहिजे. आपल्या व्यक्तिमत्व विकासात वाचनाचे महत्त्व आहे. वक्तृत्व शैली सुधारण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी सदैव अवांतर वाचन करावे, असा संदेश त्यांनी दिला. शालेय मुलांना वाचनाची गोडी लागावी, याकरीता भरत गावडे यांनी साने गुरुजी, व समर्थ रामदास लिखित पाच पुस्तके भेट म्हणून शाळेला दिली.
विकास गोवेकर यांनी ‘आठवणीतील कवितां’चा भाग समजावून सांगून मानवता धर्म यावर गीत सादर केले. सानेगुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकातील एक कथा भरत गावडे यांनी सांगितली. या कार्यक्रमाला माता पालक उपस्थित होत्या. मार्गदर्शनावर आधारित भागावर मुलांची ‘श्रवणशक्ती’ पाहण्यासाठी पाच प्रश्न विचारण्यात आले. या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे ज्या मुलांनी दिली. त्यांचा गौरव प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चैताली गवस, भक्ती फाले, राजेश जाधव, हेमराज देसले यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचलन महेश लांबे यांनी केले.

You cannot copy content of this page