सहकारी संस्था मदतीसाठी तयार;
नारायण गावडे यांचे आश्वासन
⚡बांदा ता.२१-: दुधाची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनातून आर्थिक उन्नती व्हावी यासाठी संस्था नेहमीच प्रोत्साहन देत असते. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक मार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. आणि ईतर सलग्न आर्थिक महामंडळे, तसेच शासनाच्या नवनवीन योजनांचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी. त्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन संस्था करेल फक्त त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन बांदेश्वर दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावडे यांनी येथे केले.
गोकुळ कडून प्राप्त बोनसच्या मध्ये भरघोस वाढ करून गाईच्या दूधला ८ टक्के आणि म्हशीच्या दुधाला १०.५० टक्के बोनस देण्यात येणार आहे. गणपती उत्सवाला आणि दिवाळीला भेटवस्तू तसेच वाढीव बोनस असे वर्षभर शेतकऱ्यांच्या हिताचे कार्यक्रम संस्था करत असतेच. शेतकऱ्यांना शासनस्तरावर जादा आर्थिक फायदे आणि शंका निरसनासाठी एक समिति करण्यात येईल असे संस्थेचे खजिनदार रत्नाकर आगलावे यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी, सहकार कायद्याच्या अधीन राहून संस्थेचा फायदा आणि शेतकऱ्यांचा नफा या दोन्ही विचारात घेवून भविष्यात कार्यरत राहू असे सर्व संचालक मंडळाने यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम उर्फ बाळा आकेरकर, सचिव मनोज सावंत, संचालक अनिरुद्ध उर्फ नंदू पिळणकर, आनंद वसकर आदी उपस्थित होते.
