मालवण मच्छी मार्केट मध्ये पाणी पुरवठा बंद;

मच्छीविक्रेत्या महिला आक्रमक

⚡मालवण ता.२०-: गेली आठ दिवस मालवण मच्छिमार्केटमध्ये पाण्याची सुविधा बंद झाल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून याबाबत नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त बनलेल्या मच्छि विक्रेत्या महिलांनी आज मालवण नगरपालिकेत धडक देऊन आरोग्य विभागाच्या मुकादमाला धारेवर धरले. नगरपालिका प्रशासन आमच्या कडून कर वसूल करते मात्र येथील समस्याजवळ दुर्लक्ष करते असा आरोप महिलांनी करत मच्छी मार्केट मधील समस्या न सोडविल्यास महिला अधिक आक्रमक बनतील असा इशारा दिला.

मालवण नगरपालिकेच्या
मच्छिमार्केट मध्ये पाणी व वीज विषयक निर्माण झालेल्या समस्यामुळे मच्छिविक्री करणाऱ्या महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने आज संतप्त महिलांनी नगरपालिकेत धडक देत आरोग्य विभागात मुकादम वळंजू यांची भेट घेतली. यावेळी माधुरी खवणेकर, सुप्रिया केळुसकर, सुप्रिया चव्हाण, संगीता मुळेकर, सुचित्रा खडपकर, कांचन कांदळगावकर, गीता माळगावकर, वनिता माणगांवकर, कर्मिन फर्नाडिस, लक्ष्मी जामसंडेकर, दिशा सागवेकर, श्रद्धा लोणे, प्रतिभा कोचरेकर, रजनी आडकर, वैशाली गिरकर, मॅगी ब्रेगाझा, जॅकीन काळसेकर, अनिता खोबरेकर, तारामती डोर्लेकर, सुवर्णा केरकर आदी महिला उपस्थित होत्या.

यावेळी महिलांनी मच्छी मार्केट मधील समस्यांचा पाढाच वाचला. आठ दिवसांपूर्वी मच्छिमार्केट मधील पाण्याचा पंप जळाला, त्यामुळे याठिकाणचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत आम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला याबाबत विनंती देखील केली. मात्र नगरपालिकेकडून कोणतीही उपाययोजना झाली नाही. पाणी नसल्याने स्वच्छते अभावी मच्छिमार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. मार्केट मधील शौचालयात पाणी नसल्याने महिलांनाही जाणे कठीण बनले आहे. शिवाय मार्केट मधील पाण्याचे नळ नादुरुस्त आहेत. तर लाईटची देखील दुरवस्था आहे. मच्छिविक्रेत्या महिलाच हे नादुरुस्त ट्युब लाईट ब्लब स्वखर्चाने करतात. मग नगरपालिका प्रशासन कर वसुली करत असेल तर या समस्या सोडवणार कोण? असा सवाल महिलांनी केला. नगरपालिका कर्मचाऱ्यानी मच्छिमार्केट मध्ये येऊन या समस्या जाणून घ्याव्यात अन्यथा याहीपेक्षा महिला आक्रमक होतील, असा इशारा देण्यात आला. यावर मुकादम श्री. वळंजू यांनी मार्केट मध्ये प्रथम पाण्याची व्यवस्था तात्काळ करू, असे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page