भात झोडणीचे काम करीत असताना घडली घटना;पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद
⚡सावंतवाडी,ता.२०-: माडखोल डुंगेवाडी येथे भात झोडणीचे काम करीत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने तरुणाचे निधन झाले. हा प्रकार आज सायंकाळच्या सुमारास घडला. मेघशाम रामा गावडे (५३) असे त्यांचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मेघशाम गावडे हे कोल्हापूर येथील हॉटेलमध्ये कामाला होते. दरम्यान शेतीच्या कामासाठी ते गावाकडे आले होते. सायंकाळी शेतात ते कापलेले भात झोडत असतानाच अचानक जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माडखोल माजी सरपंच सूर्यकांत राऊळ, राजकुमार राऊळ, संतोष राणे विजय राऊळ, देविदास राऊळ संतोष मेस्त्री आदी माडखोल ग्रामस्थांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या आकस्मित निधनाने गावडे कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माडखोल गावात शोककळा पसरली. रात्री उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अक्षय गावडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आई, चार भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
