⚡मालवण ता.१७-: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून विद्यार्थ्यांनी पदवीचा अभ्यास करतानाच विपुल वाचन करावे व अधिकाधिक ज्ञान संपादित करावे. वाचना विषयी विद्यार्थ्यामध्ये असलेली अनास्था त्यांनी दूर झटकून ग्रंथ संग्रहाचा पुरेपूर वापर करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. प्रा. बी.एच. चौगुले यांनी डॉ. कलाम यांचे अवकाश व संरक्षण क्षेत्रातील योगदान याबाबत माहिती दिली. प्रा. एच.एम. चौगले यांनी वाचनाचे फायदे विद्यार्थ्यांना समजावले. तर ग्रंथपाल संग्रामसिंह पवार यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.एच. चौगुले व आभार प्रा. जाधव यांनी केले.
