ह भ प सुहासबुवा वझे करणार मार्गदर्शन
बांदा/प्रतिनिधी
गोमंतक संत मंडळ संचलित फोंडा कीर्तन विद्यालयाचे २८ वे निवासी कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिर दिवाळीच्या सुट्टीत २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत नागेशी बांदोडा येथील श्री नागेश संस्थांनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. कीर्तनकार ह. भ. प. सुहासबुवा वझे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चार दिवसांचे शिबिर चालणार आहे. या शिबिरात कीर्तन शिकू शकणारे ११ वर्षावरील कोणीही सहभागी होऊ शकतात. या संधीचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कीर्तन प्रेमिना देखील मिळणार आहे.
नागेश संस्थांनाचे अध्यक्ष दामोदर भाटकर यांनी ही माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी देवस्थानाचे पदाधिकारी प्रशांत शेणवी- केसरकर, संजीव सरदेसाई, पुरोहित सचिन दाते, प्रसाद वझे, सुहासबुवा वझे, कीर्तन विद्यालयच्या पालक शिक्षक संघांचे अध्यक्ष देवानंद सुर्लेकर, संतोष कुर्टिकर आदी उपस्थित होते.
या शिबिरात कीर्तन, स्तोत्रे, आरत्या, जोगवा, गोंधळ, योगा, हनुमान चालिसा, अभिनय, संगीत, संस्कृत, नामस्मरण, नामदिंडी, भगवदगीता, तालाची माहिती आदी कीर्तनला उपयुक्त गोष्टी शिकविण्यात येतील. आतापर्यंत संत समाजातर्फे आयोजित केलेल्या २७ शिबिरातून हजारो मुलांनी प्रशिक्षण व शिक्षण घेतले आहे.
शिबिरात सुहासबुवा वझे यांच्यासह विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचा भाग म्हणून ‘देव, देश, धर्म संस्कृती संवर्धन’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. शिबिर काळात नामदिंडी तसेच प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. याशिवाय मुलांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येईल. सर्व समाजातील मुलांना कीर्तनाचे प्रशिक्षण मिळावे तसेच संस्कार, एकता, देशप्रेम व हरीनामाची गोडी लागावी या हेतूने दरवर्षी हे शिबीर आयोजित करण्यात येते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी नित्य वापरातील कपडे, वही, पेन, झान्ज, भग्वद्गीतेची प्रत हे साहित्य सोबत घेऊन २७ रोजी सकाळी ९ वाजता शिबिरासाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी अर्चना प्रभू (मो. ९८६०९०६७००) किंवा आर्या साळगावकर (मो. ७३८७१६३७७१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
