विविध संघटनांना शासन दरबारी प्रश्न सोडविण्याची निलेश राणे यांची ग्वाही

हडी येथे समस्या मांडत संघटनांनी सोडविण्याची केली मागणी

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी हडी ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत माजी खासदार व भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्याकडे समस्या मांडत या समस्या शासनस्तरावर सोडविण्याची मागणी राणेंकडे केली. संघटना प्रतिनिधींनी मांडलेल्या लेखी स्वरुपातील समस्या शासन दरबारी संबंधित मंत्रिस्तरावर मांडून लवकरात लवकर सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

सरपंच संघटना, वाळू चिरे, ठेकेदार संघटना, वीज वितरण कंत्राटी कर्मचारी, बांधकाम, किल्ला होडी, जेटी स्टॉलधारक आदींसह विविध संघटनांना येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी हडी ग्रामपंचायत येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी प्रत्येक संघटना प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे चर्चा केली. आपले प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, आबा हडकर, राजन गावकर, महेश बागवे, दादा नाईक, संतोष गावकर, दीपक सुर्वे, शेखर कांबळी आदी उपस्थित होते.

मालवण बंदर जेटी येथे पर्यटन हंगाम सुरू झाल्याने तात्पुरते स्टॉल उभारून व्यवसाय करण्यासाठी स्थानिकांना, बचतगटांना तसेच इतरांनाही संधी देण्यासाठी मेरिटाईम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परवानगी देण्यात येईल. असे आश्वासन राणे यांनी दिले.

You cannot copy content of this page