⚡मालवण ता.१६-: मालवण तालुक्यातील जि. प. आचरा उर्दू शाळेची सिंधुदुर्गातील एकमेव अल्पसंख्याक विभागातील आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड होऊन आज रविवारी बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरा नं. २ येथील बाल कथाकथन महोत्सवात जि. प. आचरा उर्दू शाळेचा गौरव करण्यात आला.
१९७२ साली या शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक जनाब आयुब युनूस शेख यांनी शाळेत साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. त्यानंतर मेहरुन्नीसा भेंडवाडे, आफताब पटेल आदी अनेक शिक्षकांनी ते कार्य पुढे सुरू ठेवले. अजूनही या शाळेत कथामाला उपक्रम दरवर्षी शाळा प्रारंभापासून सुरू होतो. कथाकथनापासून समाजसेवेपर्यंत सर्व उपक्रम राबविले जातात. या शाळेने कथामालेचे विविध उपक्रम राबवून कथामालेचे कार्य मुलामुलांत, घराघरात पोहोचविले आहे. म्हणून अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका समितीने या शाळेची कथामालेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड करण्यात आल्याचे साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकुर यांनी सांगितले. शाळेत कथामालेचा उपक्रम चिरंतन ठेवण्यासाठी जुलेखा अजीम आगा, तबस्सुम साजिक मुजावर, आझासनिसा उस्मान सोलकर, नाझिया सलीम खान आदी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
जि. प. आचरा उर्दू शाळेचा बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरा नं. २ येथील बाल कथाकथन महोत्सवात गौरव करण्यात आला. हा सत्कार सोहळा वायंगणीच्या ज्ञानदीप विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक प्रकाश पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्रमुख मान्यवर म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या गोवा झोनचे डेप्युटी झोनल मॅनेजर आनंद डिंगणकर उपस्थित होते. यावेळी कथामालेचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी सय्यद मुश्ताक, सय्यद मुसा, अस्मा अश्फाक मुजावर या उर्दू माध्यमातील दोन कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
