मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत

तर ग्रामीण भागातील भातशेती पाण्याखाली

⚡बांदा ता.१६-: आज सायंकाळी बांदा शहर व परिसराला मुसळधार परतीच्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या गडगडाटासह ढगफुटीसदृश्य कोसळलेल्या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पडलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले तर ग्रामीण भागात भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
आज दुपारी ३ वाजता मुसळधार पाऊस सुरु झाला. शहरातील गटारे तुंबल्याने बांदा -दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे तर बांदा वाफोली रस्त्यावर निमजगा येथे रस्ता पाण्याखाली गेला होता. शहरात ठिकठिकाणी गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यावर येऊन शहरातील रस्ते जलमय झाले होते. मुसळधार पावसामुळे व्यापारी, स्थानिक भाजी विक्रेते यांना फटका बसला. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांना देखील पावसाचा फटका बसला.
ग्रामीण भागाला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले. कापणीला आलेले भात पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर याठिकाणी भात कापणी पूर्ण करण्यात येते, मात्र आज मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांसमोर भातशेती वाचवायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

You cannot copy content of this page