प्राचार्य गोविंद काजरेकर;गोगटे वाळके महाविद्यालयात वाचक दिन साजरा
बांदा /प्रतिनिधी
नव माध्यमांच्या आक्रमणामुळे आजची पिढी वाचनापासून दूर गेल्याचे चित्र समोर येत आहे. समाजाच्या निकोप आरोग्यासाठी वाचन हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. वाचनामुळे जगण्याची शिकवण मिळते, माणसे व समाज कळतो, जीवन समृद्ध होते. आजवरचे सारे लोकनेते पाहता ते उत्तम वाचक होते. त्यांनी जगणे अनुभवले आणि ते ग्रंथातून प्रगट केले. त्यामुळे या लोकनेत्यांच्या विचारांचा वारसा समाज आजही जपताना दिसतो. म्हणून समाज घडणीसाठी वाचनाची सवय अंगी बाणवली पाहिजे. असे प्रतिपादन मराठीतील जेष्ठ कवी व समीक्षक गोगटे- वाळके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले.
गोगटे-वाळके महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्राचार्य डॉ. काजरेकर बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अकाउंटन्सी विभागाचे प्रमुख डॉ. ए. पी. महाले हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रंथपाल अनिल आनंदा शिर्के यांनी केले.
प्राचार्य डॉक्टर काजरेकर पुढे म्हणाले की, वाचन आपणास जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देते. वाचनातून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व फुलवता येते. आपले जीवन बदलते आणि आपले जगही बदलते. आत्ताच्या समाजामध्ये ग्रंथ वाचनाविषयी आस्था, प्रेम, सद्भावना निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. आजचे युग ज्ञानाधिष्ठित समाजरचनेचे आहे, माहितीच्या युगाचे आहे. आपणास बलशाली राष्ट्र घडवण्यासाठी वाचनावर आधारलेला सुसंस्कृत समाज निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी बोलताना डॉ. महाले म्हणाले की वाचनाने व लिखाणाने आत्मविश्वासाबरोबर जीवन सामर्थ्य वाढीला लागते. ज्ञान-विज्ञान, कला, संस्कृती अशा अनेकप्रसंगी वाचन करीत जावे. आधुनिकतंत्राचा वापर करून सुद्धा वाचन करता येते. नाविन्याचा ध्यास असलेली माणसं वाचनाला महत्त्व देतात. एखाद्या लेखकावर, एखाद्या पुस्तकावर भरभरून प्रेम करायला शिका व आपल्या जीवन जाणिवा समृद्ध करा. यावेळी वाचन संस्कृती रुजावी म्हणून महाविद्यालयातील गंधाली कदम, पुंडलिक घाडी, अर्पिता बांदिवडेकर, विठ्ठल दळवी या विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देऊन त्यांचा गौरव करण्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी केले.
