मालवणची ग्रामदैवते रामेश्वर- नारायण पालखी सोहळा २६ रोजी

⚡मालवण ता.१४-: मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासीक पालखी प्रदक्षिणा सोहळा बलिप्रतिपदा म्हणजे दीपावली पाडव्या दिवशी दि. २६ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. कोरोना महामारी संकटाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर यावर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून सोहळ्यास प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरातून या पालखी सोहळ्यास सुरूवात होणार आहे. श्री देव रामेश्वर व नारायणाचे वर्सलदार कुटुंबिय आणि गावकर मानकरी रामेश्वरासमोर श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे करतात. ढोल-ताशांच्या गजरात रामेश्वर व नारायणाची पालखी मालवणच्या परिक्रमेसाठी निघते. प्रारंभी रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा करण्यात येते. हि पालखी आडवण मार्गे वायरी तानाजी नाका येथून भूतनाथ मंदिर येथे भेट देते. भूतनाथ येथे पालखीसोबत आलेल्या मानकरी प्रजाजनांना बोडवे गावकर यांच्याकडून श्रीफल भेट देऊन स्वागत करण्यात येते. त्यानंतर समुद्र किनाऱ्यामार्गे मोरयाचा धोंडा येथे भेट देऊन दांडी येथील दांडेश्वर मंदिरात काही काळ थांबल्यानंतर पुन्हा किनाऱ्यामार्गे मेढा येथील श्री देवी काळबादेवी मंदिर येथे थांबते. याठिकाणी रामेश्वर नारायण आणि त्यांची बहीण काळबादेवीचा पारंपरिक भाऊबीज सोहळा मोठ्या थाटात साजरा होतो. त्यानंतर पालखी जोशी मांड येथे थांबते. देवतांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री पालखी बंदर जेटी मार्गे बाजारपेठेत प्रवेश करून बाजारपेठेत रामेश्वर मांड येथे भाविकांना दर्शन देण्यासाठी पालखी थांबते. त्यानंतर रात्री उशिरा बाजारपेठ मार्गे भरड येथून पुन्हा देऊळवाडा येथे मंदिरात पालखी विसर्जित होते.

या पालखी सोहळ्यानिमित्त ग्रामदेवतांच्या स्वागतासाठी मालवणनगरी सजलेली असते. या पालखी सोहळ्यास मोरयाचा धोंडा, देव दांडेश्वर, बंदर जेटीपर्यंत समुद्र किनारी तसेच बाजारपेठेत भाविकांची प्रचंड गर्दी असते. ठिकठिकाणी रांगोळ्या, पताका, पुष्पवृष्टी करून व फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचे स्वागत केले जाते. दांडी समुद्र किनाऱ्यावर वाळूची मंदिरे, देखावे साकारण्यात येतात. मच्छीमारी नौका सजविण्यात येतात. मच्छीमारांकडून देव रामेश्वराचे उत्साहात स्वागत करण्यात येते. तसेच किनाऱ्यावर ठिकठिकाणी भाविकांसाठी सरबताची व्यवस्था करण्यात येते. बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून पालखीचे जल्लोषी स्वागत होते. या सोहळ्याच्या निमित्ताने मालवण बाजारपेठेतही मोठी आर्थिक उलाढाल होऊन व्यापार- व्यवसायास नवी ऊर्जा प्राप्त होते.

गेल्या दोन वर्षात हा पालखी सोहळा कोरोनाच्या निर्बंधाखाली साजरा झाला होता. तर गतवर्षी या सोहळ्यास पावसानेही हजेरी लावली होती. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट ओरसले असल्याने हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या मोठ्या गर्दीत साजरा होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राज्य सरकारने सर्व धार्मिक कार्यक्रमांवरील बंधने शिथील केल्याने यावर्षी उत्साहात पालखी सोहळा होणार आहे. हवामान खात्यानेही २६ ऑक्टोबरपर्यंत पाऊस परत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाच्या सूचनांचे पालन करून हा सोहळा होणार असल्याचे देवस्थान ट्रस्टने स्पष्ट केले आहे. यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही देवस्थान ट्रस्टने केले आहे.

You cannot copy content of this page