विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबरोबरच अवांतर वाचनाची सवय आपल्यामध्ये अंगिकारून सर्वज्ञानी व्हावे

मालवणचे ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर यांचे प्रतिपादन

⚡मालवण ता.१४-: गाढे वाचन आणि लिहीत राहण्याची आवड यामुळे आपण साहित्य क्षेत्रात चांगले योगदान देऊ शकलो. मुलांनीही अवांतर वाचन करावे जेणेकरून त्या वाचनातून विद्यार्थ्यांना विविध विषयाची कवाडे खुली होऊन त्यांना माहितीच्या सागरात मुक्तपणे विहार करता येईल म्हणून विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबरोबरच अवांतर वाचनाची सवय आपल्यामध्ये अंगिकारून सर्वज्ञानी व्हावे असे प्रतिपादन मालवणचे ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने साहित्यिक आपल्या भेटीला पुष्प तीन आणि चार अंतर्गत मालवणचे ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर आणि कवियत्री सौ. सुपर्णा शिवाजी म्हापणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक वामन खोत, पर्यवेक्षक एच. बी. तिवले, आर. डी. बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, सौ. अस्मिता वाईरकर, कुमारी सुनंदा वराडकर आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री. खोत यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. तर कु. वराडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी श्री. म्हापणकर यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते आणि लिहिण्याची प्रेरणा मिळते. आपणही भंडारी हायस्कूल मध्ये शिकत असताना नाटक करता करता नाटक, एकांकिका लिहायला लागलो, कविता करायला लागलो त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शालेय जीवनात साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातही सहभाग दर्शवावा आणि आपली प्रगती साधावी असे आवाहन केले. यावेळी श्री म्हापणकर यांनी रंगभूमीवरील नाटकातील गमती जमती विद्यार्थ्यांना सांगून त्यांना हास्यकल्लोळात रमविले तर सौ. सुपर्णा म्हापणकर यांनी त्यांनी लिहिलेल्या उखाण्याच्या पुस्तकातील उखाणे, म्हणी, वाक्प्रचार सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.

यावेळी अरविंद म्हापणकर यांचा दशरथ कवटकर यांच्या हस्ते तर सुपर्णा म्हापणकर यांचा सौ. अस्मिता वाईरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. डी. बनसोडे यांनी केले.

You cannot copy content of this page