⚡मालवण ता.१३-: अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन शाखा सिंधुदुर्गच्या वतीने कळसुली गवसवाडी कणकवली येथे जादूटोणा विरोधी कायदा २०१३ या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान कार्यक्रम पार पडला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सिंधुदुर्गचे जिल्हा सरचिटणीस विजय चौकेकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले.
नास्तिक शिरोमणी चार्वाक, गौतम बुद्ध, संत रविदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत नामदेव संत एकनाथ आदी संतांनी मानवाच्या मनामनातील असलेल्या अंधश्रद्धा अनिष्ठ रूढी परंपरा आदींवर कडाडून हल्ला केला होता. बुवा, मांत्रिक यांच्याकडून देव धर्माच्या नावाखाली जनतेची लुबाडणूक केली जाते, त्यापासून जनतेला संरक्षण मिळावे यासाठी जादूटोणा विरोधी कायदा बनविण्यात आला असे यावेळी विजय चौकेकर यांनी सांगत समाजातील अंधश्रद्धा दूर करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे व आनंदी समाज निर्माण करणे हा प्रबोधनामागील उद्देश असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जादूटोणा विषयक विविध प्रात्यक्षिके दाखवून त्यामागील वैज्ञानिक कारणे समजावून सांगण्यात आली.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सहसचिव संजय खोटलेकर, काळसुली गवसवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक सावंत, जयेंद्रथ देसाई, सहायक शिक्षिका रुपाली जाधव, अरविंद दळवी, चंद्रकांत चव्हाण, दिलीप सावंत आदी तसेच पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
