जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांची माहिती
ओरोस ता.१२-:
ग्रामीण भागातील शाळा टिकाव्यात, ग्रामीण भागातील वाडीवस्तीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जाऊ नयेत. म्हणून आपल्या गावातील शाळा वाचवण्यासाठी शिक्षक भारती व छात्र भारतीने राज्यभरातून पुढाकार घेतला आहे. प्रशासन पातळीवर कमी पट संखेच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याने गावोगावी शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव करून या निर्णया विरूध्द आवाज उठवला जाणार असल्याची माहिती शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.
या मोहिमेला विद्यार्थी मित्र, पालक, ग्रामस्थ, समविचारी संघटना, सामाजिक संस्था, शिक्षक भारतीचे पदाधिकारी, मा.जिल्हा परिषद सदस्य, मा.पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या
ठरावाची एक प्रत जिल्हा अधिकारी, दुसरी प्रत आमदार कपिल पाटिल यांना पाठवण्यात येणार आहे. हा लढा एवढ्या वर न थांबवता सोमवार १७ ऑक्टोबर रोजी गावपातळीवरील आलेले ठराव जिल्हास्तरावर एकत्र करून जिल्हा संघटने मार्फत जिल्हाधिकारी यांना शाळा बंद करण्यात येवू नये म्हणून निवेदन देण्यात येणार आहे. तसेच आमदार कपिल पाटील ठरावाच्या प्रती स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री याना देणार आहेत.
आगामी हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षक भारती व छात्र भारती विद्यार्थी संघटनेतर्फे होणाऱ्या मोहिमेत सहभागी व्हावे. असे आवाहन राज्य उपाध्यक्ष द्या नाईक, राज्य संघटक किसन दुखंडे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस अरूण पवार, महिलाध्यक्ष आशा गुणीजन, महिला सचिव वैशाली गर्कल, मुख्य सल्लागार महेश नाईक, कोषाध्यक्ष रविंद्र देसाई यांनी केले आहे.
