मालवणात शिवसैनिकांकडून शिंदे गटाचा आगळा वेगळा निषेध

गद्दार खोकासुर लिहिलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मशालीने आग पेटवून केले दहन

मालवण (प्रतिनिधी)
“गद्दारांनी चिन्ह गोठवल… शिवसेनेचे रक्त पेटवल… उद्धव ठाकरे आगे बढो… हम तुम्हारे साथ है”… अशा जोरदार घोषणा देत आज मालवणात शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी “गद्दार खोकासुर” असे लिहिलेल्या प्रतिकात्मक खोक्याचे मशालीद्वारे दहन करून शिंदे गटाचा तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान, या निषेधानंतर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर टीकास्त्र सोडताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यास शिंदे गट लायक नसून शिवसेनेला चिन्ह बदलावे लागल्याने जुन्या काळातील शिवसैनिक प्रचंड दुखावले असून त्यांच्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे शिवसैनिक आता पुन्हा सक्रिय होत असून या खोकसुराना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा देतानाच श्री भाई गोवेकर यांनी दीपक केसरकर व उदय सामंत यांना शिवसेना किती माहिती आहे, केसरकर व सामंत यांचे शिवसेनेत योगदान काय असा सवालही त्यांनी केला

यावेळी भाई गोवेकर यांच्यासह हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, उमेश मांजरेकर, संमेश परब, अमेय देसाई, नरेश हुले, महेंद्र म्हाडगुत, गौरव वेर्लेकर आदी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना श्री भाई गोवेकर म्हणाले , बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या सारख्या जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन शिवसेना उभी केली. बाळासाहेब यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी तेवढ्याच ताकदीने पक्ष वाढवला. मात्र आजारपणात ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीने उद्धव ठाकरे यांनी संघटनेची धुरा दिली, त्या एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करीत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिक भडकले आहेत. जो शिवसेनेच्या विरोधात गेला, तो आमच्यासाठी संपला. त्याला आम्ही मानत नाही. १९६९ साली बाळासाहेब पहिल्यांदा मालवण मध्ये आले होते. तेव्हापासून आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांना मानणारे शिवसैनिक आहोत. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्यावेळीही शिवसेनेवर बंदी आणण्याचा विचार केला नाही, मात्र ते काम शिवसेनेत जन्म घेतलेल्या गद्दारांच्या मदतीने भाजपने केले, अशी टीका गोवेकर यांनी करून जिल्हाप्रमुख पदाच्या कालावधीत मी आणि माझे सहकारी मुंबई, ठाणे येथे जात होतो, तेव्हा ठाण्यात आनंद दिघे यांची काही ना काही कामानिमित्त भेट होत असे. त्यावेळी एकनाथ शिंदे त्यांच्या आजूबाजूला देखील नव्हते. एकनाथ शिंदे यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना सावरण्यासाठी आनंद दिघे यांनी राजन विचारे यांचे स्थायी समिती अध्यक्ष पद एकनाथ शिंदे यांना दिले. तेव्हापासून एकनाथ शिंदे यांचा उदय झाला. आज आनंद दिघे असते तर शिवसेनेशी गद्दारी करण्याची त्यांची हिम्मत झाली नसती, असे भाई गोवेकर म्हणाले.

लालबाग, परळसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आमच्या सारख्या जुन्या शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना उभी केली आहे . मात्र ज्या एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या आजारपणा वेळी पक्षात महत्वाची जबाबदारी दिली, त्या शिंदेंच्या गद्दारीमुळे आज निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले आहे. शिवसेना उभी करताना बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला त्याग या खोकासुरांना समजणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना उद्धव ठाकरे यांनी पुढे नेली. दीपक केसरकर व उदय सामंत यांना शिवसेना किती माहिती आहे, केसरकर व सामंत यांना आम्ही जिल्ह्यात थारा देणार नाही असेही यावेळी भाई गोवेकर म्हणाले.

यावेळी बोलताना तालुका प्रमुख हरी खोबरेकर म्हणाले शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गेल्याचे दुःख आम्हाला आहे, शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचे काम गद्दार शिंदे गटाने केले असून याचा आम्ही निषेध करतो, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यबाण हे आमच्या हृदयात असून ते कोणीही गोठवू शकत नाही. नवीन चिन्ह असलेल्या मशालीच्या रूपाने धगधगत्या आगीत लोकशाहीच्या माध्यमातून गद्दारांना भस्मसात केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असे सांगितले.

You cannot copy content of this page