तालुका प्रमुख हरी खोबरेकर
मालवण (प्रतिनिधी)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काहींनी तक्रार करत आमदार वैभव नाईक यांची चौकशी लावून त्यांच्यावर दवाब टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार नाईक हे शिवसेनेचे लढवय्ये शिलेदार असून आजपर्यंत त्यांनी शिवसैनिकांचे प्रेम, आशीर्वाद मिळविले असून हीच त्यांची मोठी संपत्ती आहे. याचाच पोटशूळ आल्याने ही चौकशी लावली गेली असून आम. नाईक त्यास बळी पडणार नाहीत, आम्ही जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
मालवण येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या समवेत उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, सन्मेष परब, अनंत पाटकर, गौरव वेर्लेकर, अक्षय रेवंडकर, दत्ता पोईपकर, सुरेश माडये यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आमदार नाईक हे राज्यात एक लढवय्या शिलेदार म्हणून त्यांना ओळखले जाते. याचा पोटशूळ आल्यानेच त्यांच्या विरोधात तक्रारी करण्याचे काम काहींनी केले आहे. मात्र अशा दबावाला आम. नाईक व शिवसैनिक बळी पडणार नाही. आमदार नाईकांनी कमविलेली संपत्ती ही शिवसैनिक आहे. त्यामुळे ही संपत्ती कशी जप्त करणार ? असा सवाल खोबरेकर यांनी उपस्थित केला.
