Headlines

सांगिर्डेवाडीत कचरा डम्पिंगविरोधात ग्रामस्थ आक्रमक

जेसीबीने रस्ता खोदून मार्ग केला बंद

कुडाळ : कुडाळ-पिंगुळी परिसरातील सांगिर्डेवाडी येथे सुरू असलेल्या कचरा डम्पिंगविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी तसेच अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर जेसीबीच्या साह्याने डम्पिंग ग्राउंडकडे जाणारा रस्ता खोदून कचरा वाहनांचा मार्ग बंद केला.
या समस्येबाबत चर्चा करण्यासाठी श्री देव वरंडेश्वर मंदिरात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कचरा डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
ग्रामस्थांनी सांगितले की, कचरा डेपोमुळे परिसरात भटके कुत्रे, कावळे आणि बगळ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कचऱ्यातील कोंबड्यांची हाडे, पिसे तसेच अन्य घाण ही जनावरे व पक्षी परिसरात पसरवत आहेत. विशेषतः पावसाळ्यात कचऱ्यामुळे तीव्र दुर्गंधी निर्माण होत असून, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत नगरपंचायतीकडे यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
के. बी. परब यांनी सांगितले की, “माणूस म्हणून जगताना आम्हाला या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन कचरा डम्पिंगची समस्या पूर्णपणे दूर करण्याची मागणी करूया.”
विनायक राणे यांनी नगरपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, सदर जागा साखळकर यांनी पाच वर्षांसाठी कचरा डम्पिंगसाठी दिल्याचे सांगितले जाते. मात्र, यासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला. पाच वर्षांनंतरही तेथे कचरा टाकला जात असेल, तर त्याची जबाबदारी नगरपंचायतीची असल्याचे त्यांनी नमूद केले. नगरपंचायतीने कचरा व्यवस्थापनासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमित सामंत यांनीही आक्रमक भूमिका घेत, “साखळकर यांनी या प्रकरणात वैयक्तिक स्वार्थ साधला असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी केली.
शासनाकडून अधिकृत करण्यात आलेल्या कचरा डम्पिंग ग्राउंडवरच नगरपंचायतीने कचरा टाकावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. सध्याच्या ठिकाणी विविध प्रकारचा कचरा एकत्रितपणे टाकला जात असल्याने त्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्याचा आरोपही करण्यात आला.
बैठकीनंतर ग्रामस्थांनी थेट डम्पिंग ग्राउंडकडे जाणारा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायंकाळी जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर चर खोदून कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचा मार्ग रोखण्यात आला.
या बैठकीस विनायक राणे, अभय शिरसाट, अमित सामंत, धीरज परब, अमित राणे, बाळ कन्याळकर, डॉ. अभय सावंत, मकरंद परुळेकर, मंदार शिरसाठ, मुक्ती परब, संदीप महाडेश्वर, गुरु गडकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page