माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांचा पाठपुरावा
⚡मालवण ता.०६-: मालवण शहरातील देऊळवाडा- आडवण येथील स्मशानभूमीतील दोन्ही शवदाहिन्या मोडकळीस आल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांनी मालवण नगरपालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन अखेर या शवदाहिन्यांच्या कामाला आजपासून प्रारंभ झाला आहे. यामध्ये मुख्य शवदाहिनीचे नूतनीकरण तर दुसऱ्या शवदाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
देऊळवाडा आडवण येथील स्मशानभूमीतील दोन्ही शवदाहिनीन्या खराब होऊन मोडकळीस आल्याने नागरिकांना मृतदेह दहन करताना अडचणींना सामोरे जावे लागत होते. या शवदाहिनींची दुरुस्ती व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत होती. याबाबत या प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांनी गेले काही महिने सातत्याने नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून हे काम मंजूर होऊन टेंडर प्रक्रियेमुळे हे काम काहीसे प्रलंबित राहिले होते. मात्र टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन नगरपालिकेच्या माध्यमातून शवदाहिनीच्या कामास आज पासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. यामध्ये मुख्य शवदाहिनीचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात येणार असून दुसऱ्या शवदाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यावेळी सौ. पूजा करलकर, प्रमोद करलकर, पिंटू गोलतकर, शेखर डिचवलकर, राजू यादव, उत्तम चव्हाण, दाजी गावकर, हरेश मेस्त्री, अनिल मेस्त्री, आदी उपस्थित होते.
शवदाहिनी नूतनीकरण व दुरुस्तीचे काम नगरपालिकेने सुरू केल्याने पूजा करलकर यांनी यावेळी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले. तर या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
