न्हावेली-चौकेकरवाडी येथील श्रीदेवी माऊली युवक कला क्रीडा मंडळाचा स्तुत्य उपक्रम: ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद
⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ- : न्हावेली-चौकेकरवाडी येथील श्रीदेवी माऊली युवक कला क्रीडा मंडळाने निर्माल्यापासून गांडूळ खत निर्मिती आणि प्लास्टिक मुक्ती हा एक स्तुत्य उपक्रम गावात राबविला. या उपक्रमाला ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
गणेशोत्सव कालावधीत बऱ्याच प्रमाणात निर्माल्य व कचरा साठतो, मात्र या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न असतो. याची दखल न्हावेली येथील श्रीदेवी माऊली युवक कला क्रीडा सेवा मंडळाने घेतली. सामाजिक कार्य म्हणून गावातील ग्रामस्थांना त्यांच्या घरातील ओला सुका कचरा इतरात्र कुठेही फेकू नका तर तो गोळा करून ठेवण्याचे आवाहन केले होते. यासाठी या मंडळाने ग्रामस्थांना दोन डस्टबिन व कॅरीबॅगची (५१ मायक्रॉन) सोय करून दिली. गणेशोत्सव झाल्यावर या मंडळाने घरोघरी जात फुले, हार, दुर्वा, बेल, कापसाच्या वाती इतर निर्माल्याच्या वस्तू वेगळ्या पिशवीत गोळा केल्या. तर अगरबत्ती पूडे, मोदक बॉक्स, दूध पिशव्या, तेल पिशव्या, द्रोण, चहाचे कप, थर्मा कॉल, सजावटीच्या वस्तू व इतर प्लास्टिकच्या वस्तू वेगळ्या पिशवीत गोळा केल्या. तसेच घरातील ओला व सुका कचरा एकत्र करून तो या मंडळांने नेऊन त्यापासून गांडूळ खत निर्मिती व प्लास्टिक मुक्ती उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे येथील वन्यजीव, जलचर प्राणी, पर्यावरण यांची होणारी हानी टाळण्यास मदत झाली. या उपक्रमामुळे नाले गटारे तुंबून येणाऱ्या पूरांवर नियंत्रण राहणार आहे. साथीचे आजार पसरणार नाहीत. गावातील या उपक्रमासाठी या मंडळाने प्रोत्साहन म्हणून बक्षीसही जाहीर केले होते. गावातील ग्रामस्थांनी सुद्धा या उपक्रमात सहभाग घेऊन या मंडळाला सहकार्य केले. या मंडळाने राबविलेला उपक्रम खरोखरच स्तुत्य उपक्रम असून इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा आहे. मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
