सीईओ प्रजित नायर
ओरोस ता.०४-:
ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करताना गतवर्षीचा कॉपी पेस्ट करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी या आराखड्यात सारखेपणा असतो. मात्र, मला यावर्षी असे आराखडे अजिबात अपेक्षित नाहीत. तांत्रिक अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जावून हे आराखडे करून घ्यायचे आहेत, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना केले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत दोन दिवसांचे प्रशिक्षण तालुका तांत्रिक समितीच्या अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी ३ व ४ ऑक्टोबर रोजी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, महिला व बाल कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भोसले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे, जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ विद्यानंद देसाई, अतिरिक्त लेखा व वित्त अधिकारी विलास आरोंदेकर, उपमुख्य कार्यकारी अभियंता लक्ष्मण परुळेकर, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, प्रशिक्षक पंढरीनाथ माणगावकर, हर्षदा वाळके, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पी आर फाले, नितीन नानचे, सारिका पावसकर आदी उपस्थित होते.
