14 लाखाच्या दारुसहं 24 लाखाचा मुद्देमाल घेतला ताब्यात
कुडाळ : कुडाळ पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबधुरीनगर जवळ दारू वाहतूक करणा-या डंपरवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बेकायदा दारूसह सुमारे 24 लाख 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 10 लाखाच्या डंपरसह धारदार कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघां विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, भारतीय न्याय संहिता (BNS), मोटार वाहन कायदा, शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 28) रात्री मुंबई गोवा महामार्गावरील बिबवणे येथे पोलिसांच्या पथकाने गोव्याहून कुडाळच्या दिशेने येणा-या सदर डंपर (MH 07 C 6737) थांबविण्याचा इशारा दिला असता चालकाने तो न थांबवता भरधाव वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून पिंगुळी टेंबधुरीनगर येथे डंपर अडवून तपासणी केली असता असता त्यामध्ये गैरकायदा बिगर परवाना वाहतूक होत असलेल्या विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्यांचे बाॅक्स आढळून आले. या कारवाईत अंदाजे 14.20 लाखांचा अवैध दारूसाठा, 10 लाखांचा डंपर तसेच एक धारदार कोयता असा एकूण 24.20 लाख 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कुडाळचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने केली. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.
