गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त:
इनोव्हा क्रिस्टा वाहनातून होत होती दारूची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल..
⚡बांदा, ता. २९-: बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांदा चेकपोस्ट येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह इनोव्हा क्रिस्टा चारचाकी वाहन असा एकूण सुमारे १२ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद बांदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रसाद पंडित पाटील (वय ३४) यांनी दिली आहे. त्यानुसार, २८ जून २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बांदा चेकपोस्ट येथे संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली.
या कारवाईत पोलिसांनी शुभम मुरलीधर बिरादार (वय २७, रा. हेरंभ, देवणी, जि. लातूर, मूळ रा. जमखंडी, कर्नाटक) आणि अजय विनायक सांगळे (वय २६, रा. आरवली, खोलवाडी, ता. वेंगुर्ला) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये टोयोटा कंपनीची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (क्र. एमएच १२ एसएफ १०५६) या वाहनासह विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. यामध्ये ओल्ड मोंक, ओक स्मिथ, रॉयल चॅलेंज, स्मिरनॉफ, मॅजिक मोमेंट्स व्होडका, रोमन व्होडका, रॉयल स्टॅग आदी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे.
या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ)(इ), ८१, ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक (बक्कल क्र. १२१३) करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नवोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, एएसआय नाईक, हेड कॉन्स्टेबल कानडरकर, हेड कॉन्स्टेबल परब, पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील व राजाराम कापसे यांनी केली.
