⚡कणकवली ता.०३-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट , कणकवलीमार्फत ‘सुत काढणारे गांधीजी’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला . या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी गोपुरीआश्रम कणकवलीच्या संचालिका अर्पिता मुंबरकर, अनिरुद्ध उपासना केंद्र, कणकवलीचे प्रकाशसिंह गुरव, दत्तात्रयसिंह सोलापुरे, रंजनसिंह नांदोसकर, कलाशिक्षक (कुडाळ) केदार टेमकर, स्वयंदीप चॅरिटेबलचे अध्यक्ष संदीप सावंत, सचिव संतोष सावंत, कवियत्री व शिक्षिका कल्पना मलये, प्रतिक सापळे, बिडवाडी हायस्कूलच्या शिक्षिका आदिमाया सावंत, अँड मनीषा सावंत व तनिष्का सावंत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गांधीजींच्या वेशभूषेतील विद्यामंदिर हायस्कूल, कणकवलीचा विद्यार्थी मालु कॉरळी याच्या चरख्यावरील सुतकताईच्या प्रात्यक्षिकाने झाली . नादब्रह्म संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी पुनम गुजर हिने आपल्या सुरेल आवाजात गांधीजीचे भजन सादर केले . कु.तनिष्का सावंत हिने बहुरूपी गांधी या पुस्तकातील ‘सुत काढणारे गांधीजी’ या गांधीजींच्या जीवनावर आधारित गोष्टीचे अभिवाचन केले .
संस्थेचे अध्यक्ष संदीप सावंत म्हणाले, हा उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मुख्य उद्देश मुलांना चरख्याची माहिती मिळावी, त्यांना चरखा जवळून पाहता यावा, तसेच हाताळता यावा आणि यासाठी प्रत्यक्षात चरखे उपलब्ध करून देण्यात आले . मुलांना यातून नवीन काहीतरी शिकता यावे आणि त्यातून आनंद घेता यावे हाच संस्थेचा प्रयास असतो . यापुढेही संस्था अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करेल असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास सावंतवाडी येथील हरिहर वाटवे आणि अनिरुद्ध सेवा केंद्र, कणकवली यांनी पुढाकार घेऊन हे चरखे संस्थेला उपलब्ध करून दिले त्याबद्दल संदीप सावंत यांनी संस्थेच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले .
उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी भाषणाची सुरुवात मुलांसमवेत रघुपती राघव राजाराम हे गांधीजींचे भजन गाऊन केली. ते म्हणाले,या ट्रस्टच्या माध्यमातून मुलांवर जे संस्कार केले जात आहेत ते आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत . ते म्हणाले की आपण गांधीजींचा एक जरी गुण उतरवला तर ती गांधीजींना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल . त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेला खूप खूप शुभेच्छा दिले .
कल्पना मलये म्हणाल्या, गांधीजींचे गुण मुलानी आचरणात आणले पाहिजेत . त्यांनी मुलांसाठी अशा प्रकारचा उपक्रम राबवल्याबद्दल संस्थेची प्रशंसा केली आणि शुभेच्छा दिल्या .
अनिरुद्ध उपासना केंद्राचे प्रकाशसिंह गुरव (राजापूर) चरखा प्रशिक्षक यांनी मुलांना छान प्रकारे माहिती सांगितली . त्यांनी चरख्याला असलेली सातचक्र म्हणजेच माणसाच्या शरीरातील सातचक्र आणि त्यानी या सात चक्राबददल मुलाना माहीती दिली मुलांच्या अनेक शंकाचे निरसन त्यानी अगदी सहज सोप्या भाषेत केले . चरखा हाताळत असताना मुलांनी खूप आनंद घेतला.
अर्पिता मुंबरकर यांनी चरख्याबद्दल उत्तम माहिती दिली . मुलांना पेटीचरखा हाताळायला शिकवल . त्यांनी गांधीजीच्या टकळी या सुतकताई यंत्राबद्दल मुलांना माहिती दिली . तसेच मुलांना वेगवेगळ्या चरख्यांची छायाचित्र दाखवून माहिती दिली . कलाशिक्षक (कुडाळ) केदार टेमकर यांनी रांगोळीतून गांधीजींचे व्यक्ती चित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक मुलांना दाखवले .
या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला मुलांकडून आणि पालकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . यामध्ये कणकवली परिसरातील आजूबाजूच्या शाळांतील मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कणकवलीतील जि.प. शाळा क्रमांक तीन, शाळा क्रमांक पाच, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सेंट उर्सुला स्कूल, बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, विद्यामंदिर हायस्कूल, विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि एस एम हायस्कूलचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी चरख्यावर सुतकताई करण्याचा मनसोक्त आनंद लुटला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तनिष्का सावंत, प्रस्तावना संदीप सावंत यांनी केले . कार्यक्रमाचे आभार आदिमाया सावंत यांनी व्यक्त केले . या कार्यक्रमाचे नियोजन संतोष सावंत व मनीषा सावंत यांनी केले .
