समीर नलावडे यांनी वेधले आमदार नितेश राणे यांचे लक्ष
⚡कणकवली ता.३०-: कणकवली शहरातील पेट्रोल पंपा समोरील फ्लाय ओव्हर ब्रिजच्या खालील भागात ब्रिजच्या पृष्ठभागावर स्लॅबच्या ठिकाणी काम करत असताना अनेक जागांवर लोखंडी पत्रे सध्या वरतीच अडकून राहिलेले आहेत. हे पत्रे जनतेच्या डोक्यावर किंवा वाहनांवर पडून जीवित हानी होण्याची भीती आहे. याबाबतची वस्तुस्थिती कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर आमदार नितेश आणि प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या समक्ष सदर प्रयत्न तातडीने सोडविण्यात यावा असे सुचविले.
फ्लाय ओव्हर ब्रिजवरील पाणी पाईपद्वारे पिलर जवळ पडण्याची गरज आहे. परंतु हे पाणी सर्विस रस्त्यांवर धबधब्या सदृश्य पडत असल्याने पादचारी व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात वारंवार लक्ष वेधून ही हयवेच्या अधिकाऱ्यांकडून कार्यवाही करण्यात आलेली नाही. याकडे देखील नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधले. त्यामुळे यासंदर्भात महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने दखल घ्यायला भाग पाडा अशी मागणी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी देखील या प्रश्नी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार आर. जे. पवार यांचे लक्ष वेधले. आमदार नितेश राणे यांनी स्वतः या फ्लाय ओव्हर ब्रिज च्या वरती अडकलेल्या पेट्रोल पंपा समोरील पत्र्याचा धोकादायक स्थितीचा स्वतः स्वतःच्या मोबाईल मध्ये फोटो देखील घेतला. कणकवली शहरात असे चार ते पाच ठिकाणी पत्रे अडकलेल्या स्थितीत असून ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या संबंधितांना सूचना द्या अशा सूचना आम.नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रत्यक्ष वस्तुस्थिती देखील आमदार नितेश राणे व नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या निदर्शनास आणली.
