वाफोली धरणाच्या दुरूस्तीसाठी जनआंदोलन….

पत्रकार परिषदेत वाफोली ग्रामस्थांचा लघुपाटबंधारे विभागाला इशारा

*💫बांदा दि.३१-:* वाफोली धरणाला लागलेल्या गळतीमुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. सन १९७५ मध्ये उभारलेल्या धरणाला गेल्या काही वर्षांपासून लागलेल्या गळतीमुळे व जीर्ण झालेल्या पाटामुळे मार्च महिन्यापासूनच वाफोलीवासियांना पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी आली आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे कष्ट वाया जात आहेत. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास प्रखर जनआंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला आहे. धरणाला गळती व पाईपलाईन लिकेज झाल्याने सध्या केवळ २४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. शेतकर्‍यांच्या बागायती पाण्याअभावी करपत आहेत. संबंधित विभागाकडे धरण दुरूस्ती व पाईपलाईन बदलासाठी वारंवार पाठपुरावा करुनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला. शेतकर्‍यांना वेळेत मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी तातडीने धरणाचे लिकेज दुरूस्ती होणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी विलास गवस, पाणी वापर संस्था अध्यक्ष धनश्री गवस, सचिव उल्हास गवस, माजी सरपंच मंथन गवस, सोसायटी चेअरमन अनिल गवस, विनेश गवस, मारुती गवस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page