गोवा दराने वीजपुरवठ्यासाठी थेट गोवा वीजमंत्र्यांची भेट घेणार – नंदन वेंगुर्लेकर..
⚡दोडामार्ग ता.०६-: दोडामार्ग शहरासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र (सबस्टेशन) मंजूर करून त्याचा प्रस्ताव एका महिन्याच्या आत शासनाकडे पाठविण्यात आला नाही, तर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा संघटनेचे समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांनी दिला. तसेच गोवा-दोडामार्ग सीमावर्ती भागातील किमान पाच ग्रामपंचायतींना प्रायोगिक तत्त्वावर गोवा राज्यातून सुमारे १ रुपये ९० पैसे दराने वीजपुरवठा सुरू करण्यासाठी लवकरच गोव्याच्या वीजमंत्र्यांची भेट घेणार असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
कसई-दोडामार्ग नगरपंचायत सभागृहात आयोजित वीज ग्राहक संघटना, व्यापारी संघटना व नगरपंचायत यांच्या संयुक्त बैठकीत वीज ग्राहकांच्या विविध समस्या आणि महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
बैठकीत पिकुळे गावातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून तातडीने वीज क्षमतेत वाढ करावी तसेच अतिरिक्त वायरमनची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मांगेली-कुसगेवाडी येथील वायरमन नागेश पांडुरंग गवस यांच्या मृत्यूनंतर तब्बल एक वर्ष उलटूनही कुटुंबाला नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यावर अभियंता हतरंगी यांनी संबंधित कुटुंबाला एका महिन्याच्या आत नुकसानभरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.
दोडामार्ग तालुक्यात सातत्याने होणाऱ्या वीज खंडित प्रकारांमुळे नागरिक त्रस्त असून, विशेष बाब म्हणून अतिरिक्त निधी मंजूर करून वीज यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी नंदन वेंगुर्लेकर यांनी केली. तर साटेली-भेडशी दशक्रोशीतील वीज कार्यालय प्रभावीपणे चालविणे शक्य नसेल, तर ते कार्यालय बंद करावे; अन्यथा नागरिकांच्या वतीने कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी यांनी दिला.
दोडामार्ग-आयी मार्गावरील विद्युत खांब उभारणीचे काम निकृष्ट व चुकीच्या पद्धतीने झाल्याने भविष्यात जीवितहानीची शक्यता निर्माण झाली असून पंचक्रोशीत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याची गंभीर तक्रार रामचंद्र ठाकूर यांनी मांडली.
या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड, समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, अभियंता हतरंगी, दोडामार्ग वीज ग्राहक संघटना अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, व्यापारी संघटना अध्यक्ष सागर शिरसाट, उभादांडा जिल्हा परिषद सदस्य व वीज ग्राहक संघटना वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, मोरगाव सरपंच आईर, कळणे सरपंच अजित देसाई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख संजय गवस, तिलकांचन गवस, गणपत डांगी, आशीर्वाद मणेरीकर, तानाजी डांगी, सुदेश मळीक, हनुमंत गवस, दिलखुश देसाई, अंकुश उर्फ भैया नाईक यांच्यासह दोडामार्ग, पिकुळे, आयी, मांगेली, आयी व परिसरातील मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते.
बैठकीत वीज समस्यांवर तीव्र नाराजी व्यक्त होत अनेक प्रश्नांवर महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली. स्वतंत्र सबस्टेशन, दर्जेदार वीजपुरवठा आणि ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून देण्यात आले.
