सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकजुटीची ताकद; राज्यातील २५ विजेत्यांमध्ये सहावा क्रमांक, वकील संघाकडून अभिनंदन..
सावंतवाडी ता.०६ -: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणूक २०२६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य अँड. संग्राम देसाई हे भरघोस मतांनी विजयी झाले. राज्यातील एकूण २५ सदस्यांपैकी सहाव्या क्रमांकाने निवडून येत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक, पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्वात लहान जिल्हा असून जिल्ह्यातील वकील सदस्यसंख्या तुलनेने कमी असतानाही अँड. देसाई यांनी मिळवलेले यश हे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी दाखविलेली एकजूट आणि पाठिंबा हा या विजयामागील मुख्य आधार असल्याचेही सांगण्यात आले.
अँड. परिमल नाईक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, हा विजय केवळ व्यक्तीचा नसून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील वर्गाच्या एकजुटीचा विजय आहे. अँड. संग्राम देसाई यांनी खंडपीठ निर्मिती, विविध न्यायालयांची उभारणी, ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची संकल्पना तसेच वकील वर्गासाठी घेतलेले हितवर्धक निर्णय यामुळे त्यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
वकील संघटनेच्या मते, अँड. देसाई यांनी पदाला दिलेला न्याय, सातत्यपूर्ण कामकाज आणि वकिलांच्या प्रश्नांसाठी केलेला संघर्ष याचीच ही विजयातून पोचपावती मिळाली आहे. तसेच काही प्रवृत्तींना मतदारांनी दिलेली ही चपराक असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आली. अँड. देसाई यांनी या विजयाबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले.
