जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात…

शिवस्वराज्य दिनी जि प अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन..

⚡सिंधुदुर्गनगरी ता ६ -: छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्याच्या प्रेरणेचा स्मृतीदिन म्हणजे शिवस्वराज्य दिन, आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारामध्ये भगवा स्वराज्य ध्वजसंहितेनुसार ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत ,आमदार दीपक केसरकर ,जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नमोनी साटम, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड व गुढीचे पूजनही करण्यात आले. यावेळी जि प उपाध्यक्ष दादा साईल, अतिरिक्त उप मुख्यकार्यकारी अधिकारी शितल पुंड , सभापती प्रीतेश राऊळ,संतोष साटविलकर ,अनुराधा नारकर ,रुहिता तांबे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद प्रशासनाने आयोजित कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य याचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आपली वाटचाल केली पाहिजे असे विचार जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी मांडले तर शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कर्तव्य नेहमी स्मरणात ठेऊन त्याचा आदर्श आपल्या जीवनात प्रत्येकाने ठेवला पाहिजे असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले .जिल्हा परिषद् अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आपले विचार मांडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची गुढी उभारली त्यांचा आदर्श घेऊन जिल्हा परिषद प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातून जिल्ह्याचा विकास आणि जिल्हा परिषदेचे नाव लौकिक होईल या दृष्टीने प्रत्येकाने काम करूया असे प्रतिपादन केले .कार्यक्रमाची सांगता राज्यगीत आणि राष्ट्रगीताने झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्र शासनाने २०२१ पासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार आज जिल्हा परिषद प्रशासनानाच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला .

You cannot copy content of this page