शिंदे गटाचे नेते तथा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे प्रतिपादन
⚡वेंगुर्ले ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायिकांना पर्यटन व्यवसाय करण्यास येणाऱ्या अडीअडचणी समस्या बाबतचे मुद्दे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाने तयार करून घ्यावेत. या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयात राज्याचे सी.एम.च्या अध्यक्षतेखाली व पर्यटन व्यवसायांना परवानगी देण्याकरता येणाऱ्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक हे मंत्रालय स्तरावर होण्याची गरज आहे. कारण याबाबतीत धोरणात्मक निर्णय होण्याची गरज आहे. हा धोरणात्मक निर्णय झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला अधिक उभारी मिळेल. त्यासाठी आपण ही बैठक मंत्रालयात लावण्यासाठी निश्चितच मदत करू. तसेच ऍग्रोटुरिझमसाठी एन ए करण्याची गरज असू नये. यासाठी सरकारने तसा धोरणात्मक निर्णय घ्यावा. असे प्रतिपादन शिंदे गटाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी वेंगुर्लेत आयोजित पर्यटन व्यवसायिकांच्या मेळाव्यात केले.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग व महाराष्ट्र चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर यांच्यावतीने जिल्हास्तरीय पर्यटन व्यवसायिकांचा मेळावा येथील साई दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या पर्यटन मेळाव्यातील चर्चासत्राचे उद्घाटन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरात माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णु उर्फ बाबा मोंडकर, उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, कॅप्टन संदीप भुजबळ, एमटीडीसी चे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, पर्यटन संस्थेचे निलेश चेंदवणकर, नकुल पार्सेकर, पर्यटन मंत्रालयाच्या माजी संचालक भावना शिंदे, आनंद कर्णिक, नायब तहसीलदार संदीप पानमंद यासहित मान्यवरांचा समावेश होता.
ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत पुढे म्हणाले, समुद्रकिनारी शॅकसाठी परवानगी मिळावी. यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यावसायिकांचे प्रयत्न आहेत. ही गोष्ट चांगली आहे. पण शॅक अशा प्रकारचे होऊ नयेत जेणेकरून किनारपट्टी बरबाद होऊ नये. तिचा गोवा करू नका.असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना येणाऱ्या समस्या अडचणी याबाबत निलेश चेंदवणकर, कपिल पोकळे, महेश सामंत व अँड सुषमा प्रभू-खानोलकर यांनी महत्त्वपूर्ण असे मुद्दे यावेळी उपस्थित केले. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे जाणारे दिशादर्शक फलक मुख्य रस्त्यावर त्याचे अंतर दाखवून अद्याप लावले गेलेले नाहीत. पर्यटन व्यवसायातील जलक्रीडा, जमिनीवरील क्रीडा व हवाई क्रीडा याबाबतचे परवाने हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन खात्याचे कार्यालय सुरू करून त्यामार्फत देण्यात यावेत. हे परवाने देण्यापूर्वी जिल्ह्यातूनच त्या त्या ठिकाणची तपासणी व्हावी. तसेच पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते तेथे पिण्याची पाण्याची सोयीसुविधा निर्माण कराव्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात निवास न्याहारी व अन्य पर्यटन व्यवसायांना जो अकृषक कर लादला जात आहे, तो बंद करण्यात यावा. व त्यांना शासनाकडून परवाने द्यावेत. या स्वरूपात आपल्या समस्या मांडल्या यावर एमटीडीसी चे अधिकारी संजय ढेकणे, बंदर खात्याचे कॅप्टन संदीप भुजबळ, वेंगुर्लेचे नायब तहसीलदार संदीप पानमंद यांनी शासकीय चौकटीत राहुन उत्तरे दिली.
यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी जिल्ह्यात पर्यटनाला गती मिळत असताना आपल्या चिपी विमानतळाच्या विकासाबाबत तेथे येणाऱ्या समस्येबाबत उहापोह केला. तेथील प्रवासासाठी चांगले रस्ते, पाण्याची सोय व विमाने उड्डाणे व ती उतरण्यास निर्माण होणाऱ्या समस्या बाबत खंत व्यक्त केली. कारण यामुळे सुद्धा पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात माजी आमदार प्रमोद जठार यांनी पर्यटन व्यावसायिक महासंघाने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय यांना येणाऱ्या समस्यांचे मुद्दे काढून त्याचा पाठपुरावा शासन व मंत्री स्तरावर सातत्याने करावा. आपणही त्यांना सहकार्य करू. केवळ समुद्र किनारा हेच पर्यटन क्षेत्र न ठेवता जिल्ह्यात अन्य ठिकाणीही विविध स्वरूपाचे पर्यटन व्यवसायाने पर्यटनाची वृद्धी करावी असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमाला व व्यावसायिकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात ब्रिगेडियर सुधीर सावंत, पर्यटन मंडळाचे माजी उपाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, पर्यटन मंत्रालयाच्या माजी संचालक भावना शिंदे, पर्यटनाचे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, नायब तहसीलदार संदीप पानमंद, याबरोबरच व्यासपीठावर असलेले मान्यवर आनंद कर्णिक,आरती कार्लेकर, श्रीमती लाड, पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर आदींचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी तर आभार पर्यटन महासंघाचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष महेश सामंत यांनी मानले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी पर्यटन स्थळांचे प्रदर्शन तसेच स्थानिक उत्पादनाचे स्टॉल लावण्यात आले होते.
