सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास ;तब्बल ८४ हजार ५०० रुपयांना फटका
⚡कणकवली ता.२८-: रिक्षा चालकाला गुंगीचे औषध देऊन सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह तब्बल ८४ हजार ५०० रुपयांना एका जोडप्याने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.देवगड – तळेबाजार येथे रिक्षा भाड्याने करून घेऊन जात तळेरे येथील रिक्षा चालकाला लुबाडण्यात आले आहे
याप्रकरणी कणकवली पोलिसात संशयित जोडप्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रिक्षा चालक असलेले फिर्यादी संजय तुकाराम तळेकर (६५ तळेरे- गावठण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एक जोडपे तळेरे बस स्टँड जवळ संजय तळेकर यांच्या रिक्षेकडे जात तळेबाजार येथे जायचे असल्याचे सांगितले. यातील त्या पुरुषाचे वय साधारण ३५ ते ४० वर्ष तर महिलेचे वय २५ ते ३० वर्ष होते. तर त्यांच्या सोबत सुमारे दोन ते अडीच वर्षाचा एक लहान मूल देखील असल्याचेही फिर्यादी यांनी म्हटले आहे.
यावेळी त्या जोडप्याने आम्हाला तळेबाजार येथे मंदिराकडे जायचे असल्याचे तळेकर यांना सांगितले. त्यावर श्री. तळेकर यांनी त्यांना १००० हजार रुपये भाडे होईल असे सांगितले. ते भाडे मान्य झाल्याने त्या जोडप्याला मुलासह तळेकर हे मंदिराजवळ घेऊन गेले. त्यावेळी त्या संशयित जोडप्याने तळेकर यांच्याशी बोलत असताना आम्हाला मूल व्हावे म्हणून त्या जोडप्याच्या मित्राने या देवीकडे मन्नत मागितली होती असे हिंदीत बोलत सांगितले. तसेच ती मन्नत पूर्ण झाल्याने आज या देवाला आलो असे त्या जोडप्याने तळेकर यांना सांगितले. त्या मंदिरात त्या जोडप्याने नारळ व पेढे ठेवून नमस्कार करून निघत असताना आम्हाला आता कुणकेश्वर येथे जायचे आहे असे तळेकर यांना सांगितले. यावेळी तळेकर यांनी रिक्षा देवगड रोडच्या दिशेने घेतली. याच दरम्यान त्या जोडप्याने आम्ही गणपतीपुळे येथील देवदर्शनाचा पेढा आणलेला आहे तो घ्या असे सांगत रिक्षा चालक तळेकर यांना पेढा दिला. व त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास देवगड जामसडे येथे रिक्षा आली असता या जोडप्याने रिक्षा एका टपरी जवळ थांबवण्यास सांगितली. रिक्षा थांबवल्यावर त्या जोडप्याने तळेकर यांना एक थंड पेयाची बाटली आणून दिली. ते थंडपेय तळेकर हे प्यायले. त्यानंतर आम्हाला कुणकेश्वर येथे जायचे नाही असे सांगत त्या जोडप्याने तळेकर यांना आम्हाला पुन्हा तळेरे स्टॅन्ड येथे सोडा असे सांगितले. व त्यानंतर पुढे काय घडले हे मला आठवत नसल्यचे श्री. तळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान यानंतर तळेकर यांना कणकवलीत एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. तळेकर यांना २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता पूर्ण शुद्ध आली त्यावेळी त्यांना आपण लुटलो गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात त्यांची ५० हजार रुपये किमतीची २० ग्रॅमची सोन्याची चैन, १२ हजारच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १४ हजार किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ८ हजार रोख रक्कम, व ५०० रुपयांचे सोनाटा गोल्डन घड्याळ असा एकूण ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्या जोडप्याने लंपास केल्याची फिर्याद श्री. तळेकर यांनी दिली आहे. त्यानुसार संशयित जोडप्या च्या विरोधात भा. द. वि. कलम ३२८ , ३७९ , ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र हा प्रकार देवगडमध्ये घडल्याने कणकवली पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून तो शून्य नंबर ने देवगड पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
