मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे प्रतिपादन
मालवण दि प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्या समोर एका विशिष्ट उद्दिष्टावर फोकस ठेवला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात असल्याने तो प्रयत्न केल्यास निश्चितपणे सापडेल आणि आपले जीवन सुखकर बनेल असे प्रतिपादन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज मध्ये हायस्कुलचे माजी विद्यार्थी श्री. चेतन रमेश राळकर (मार्च २००८ एसएससी बॅच ) यांनी संस्थेला चित्र प्रक्षेपण यंत्र (प्रोजेक्टर) आणि स्क्रीन भेट दिली. त्याचा शुभारंभ मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांच्या हस्ते प्रोजेक्टरची कळ दाबून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन श्री. सुधीर हेरेकर तर प्रमुख उपस्थितीती म्हणून संस्थेचे मानद सचिव श्री. साबाजी करलकर , त्याच प्रमाणे संस्थेचे लोकल कमिटीचे श्री. दशरथ कवटकर, श्री.जॉन नरोना, प्राचार्य श्री . वामन खोत, श्री. रमेश राळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्राचार्य श्री. वामन खोत यांनी केले
यावेळी श्री. जिरगे यांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे तीचा वापर करताना सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून काम केले पाहिजे असे वागला तरच जीवनात यशस्वी व्हाल असे सांगितले यावेळी श्री.सुधीर हेरेकर, श्री. करलकर यांची समयोचित भाषणे झाले. यावेळी मुख्याधिकारी श्री.जिरगे आणि श्री. रमेश राळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. आभार प्रा. श्री.रुपेश बांदेकर यांनी मानले. सूत्रसंचालन श्री. प्रफुल्ल देसाई यांनी केले. या कार्यक्रमास ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
