सिंधुदुर्ग महाविद्यालयामार्फत पर्यटन सप्ताहाचे आयोजन

⚡मालवण ता.२६-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने पर्यटन दिनानिमित्त पर्यटन सप्ताहाचे आयोजन दि. २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. ‘जबाबदार पर्यटन’ अशी या सप्ताहाची संकल्पना असून सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग महाविद्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. बी. एच. चौगुले उपस्थित होते. या पर्यटन सप्ताहाचा उद्घाटनाचा कार्यक्रम २७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये होणार असून यावेळी तहसीलदार अजय पाटणे, मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालवलकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात मी धामापूर बोलतोय हा माहितीपट दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी डॉ. उज्वला सामंत यांनी दिली.

या सप्ताहात दि. २८ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात सकाळी ९ ते ११ या वेळेत जबाबदार पर्यटन या विषयावर जिल्हास्तरीय खुली पोस्टर स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रा. के. के. राबते (८३८१०२२५२९), प्रा. एच. एम. चौगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. सामंत यांनी केले. दि. २९ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात सकाळी ९ वाजता विद्यार्थ्यांसाठी पर्यटन विकास या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम होणार असून यासाठी युथ बिट्स फॉर क्लायमेट चेंज या ग्रुपचे सहकार्य लाभणार आहे. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता हडी येथे निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ व एकोमेट्स ग्रुप यांचे सहकार्य लाभणार आहे. या निसर्ग सहलीत सहभागी होण्यासाठी डॉ. उर्मिला मेस्त्री ९४०४३९६५०२ व प्रा. डी. व्ही. हारगिले ९४२११८९९०७ यांच्याशी संपर्क साधावा असे यावेळी डॉ. सामंत यांनी सांगितले.

तसेच दि. १ ऑक्टोबर रोजी मालवण नजीकच्या गावांमध्ये पर्यटन जागृती सर्व्हे करण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रच्या पर्यटनावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा होणार असून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी होणार आहे. तर दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयात या सप्ताहाचा सांगता सोहळा होणार असून यावेळी आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत या मार्गदर्शन करणार आहेत. तरी या पर्यटन सप्ताहाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी, पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक व नागरिक, पर्यावरण प्रेमी आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्या डॉ. सामंत यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page