पेन्शनर्स असोसिएशनचे मनोहर आंबेकर, सुरेश पेडणेकर यांचे आवाहन
⚡कणकवली ता.२४-: काही प्राथमिक शिक्षक १ जुलै १९७२ रोजी अथवा त्यानंतरच्या दिनांकाला प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू होऊन काही अपरिहार्य कारणास्तव प्रशिक्षित होऊ न शकल्यामुळे अप्रशिक्षित म्हणून सेवानिवृत्त झाले. अशा शिक्षकांना शासनाने सेवानिवृत्ती विषयक सर्वप्रकारचे आर्थिक लाभ नाकारले होते. हा त्यांच्यावर झालेला अन्याय होता. त्याखातर महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांनी उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयपर्यंतचा शासनाविरुद्ध लढा देऊन महाराष्ट्रातील अशा सर्व शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. अशी माहिती पेन्शनर्स असोसिएशन जिल्हाध्यक्ष मनोहर आंबेकर, उपाध्यक्ष सुरेश पेडणेकर, सल्लागार चंद्रकांत अणावकर व सदस्य सुधाकर देवस्थळी यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी महोदयांनी आपल्या जिल्ह्यातील अशा शिक्षकांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन २०१८ मध्येच लाभ दिले, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी यांनी दि. २०/०२/२०२२ च्या शासनाकडील पत्रानुसार आपल्या जिल्ह्यातील ३५ शिक्षकांची सर्व प्रकरणे तात्काळ पूर्ण करण्याची कार्यवाही केली. तसेच या शिक्षकांना तात्काळ लाभ द्यावा म्हणून संबंधित तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या १-२ विशेष सभा घेऊन सूचना दिल्या. संबंधित सर्व निवृत्त शिक्षकांना ०१/०६/२०२२ रोजी आपल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात निमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. शिवाय त्यांच्या पेन्शन मंजुरी आदेशाचे जाहीररित्या वाटप केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा शिक्षकांना लाभ कधी मिळतो ते पाहावयाचे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे आठ शिक्षक आहेत परंतु अद्यापही त्यांच्या फाईल व प्रस्ताव इकडून तिकडे जाण्यातच सर्ववेळ जात आहे. देवगड तालुक्यात यापैकी नव्याने एक शिक्षिका आढळून आली आहे. तसेच या जिल्ह्यात याप्रकारचे आणखी कोणी शिक्षक असतील तर संबंधित शिक्षकांनी आपण ज्या तालुक्यातून निवृत्त झाले. त्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी व जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी त्वरित पत्रव्यवहार करुन संपर्क साधावा असे आवाहन पेन्शनर्स असोसिएशन जिल्हाध्यक्ष मनोहर आंबेकर, उपाध्यक्ष सुरेश पेडणेकर, सल्लागार चंद्रकांत अणावकर व सदस्य सुधाकर देवस्थळी यांनी केले आहे. संपर्कासाठी मोबा. ९४२०९७२०२१ / ९४२२६३३८५७ / ८४५९४०७५३३ यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
